मूलभूत समस्याही अजून ‘जैसे थे’च

By admin | Published: November 25, 2014 10:23 PM2014-11-25T22:23:24+5:302014-11-26T00:03:43+5:30

उद्योगांची प्रतीक्षा : पर्यटन विकासाला चालना हवी; सांडपाण्याचा प्रश्न गंभीर --रेंगाळलेले प्रश्न

The basic problem still was 'like' | मूलभूत समस्याही अजून ‘जैसे थे’च

मूलभूत समस्याही अजून ‘जैसे थे’च

Next

अनिल कासारे- लांजा -हक्काचा लोकप्रतिनिधी नसल्याने लांजा तालुक्याचा विकास खुंटला आहे. याची सल लांजावासीयांच्या मनाला नेहमीच बोचते. त्यादृष्टीने प्रयत्नदेखील करण्यात आले. मात्र, लांजावासीयांच्या पदरामध्ये निराशा पडत गेली. उद्योगधंदे नसल्याने येथील तरुणवर्ग मुंबई, पुणे येथील मोठ्या शहरामध्ये रोजगारासाठी गेल्याने येथील शेती ओस पडते की काय? असा प्रश्न आहे. धरणे असूनही पाण्याचे योग्य नियोजन नाही, रस्ते, पर्यटन यांचा विकास झाला नसल्याने येथील जनतेला नेहमीच समस्यांना झगडावे लागते. नेहमीच सत्तेच्या विरोधातील आमदार तालुक्याला लाभले. तसेच दोन विधानसभा मतदारसंघामध्ये लांजा तालुक्याचे विभाजन झाल्याने लांजा तालुका विकासापासून नेहमीच वंचित व दुर्लक्षित राहिला आहे.
लांजाची भौगोलिक परिस्थिती पाहता डोंगरदऱ्यामध्ये वसलेली ८४ खेडी होती. एका बाजूला सह्याद्रीच्या उंचच उंच पर्वत रांगा, तर दुसऱ्या बाजूला रत्नागिरी, राजापूर संगमेश्वर तालुके आहेत. लांजा हे एक गाव होते. हळूहळू या खड्याचे स्वरुप बदलत गेले आणि याचे शहरामध्ये रुपांतर झाले. मुंबई-गोवा महामार्ग या शहराच्या मध्यातून जात असल्याने महामार्गाच्या दोन्ही बाजूला व्यावसायिकांनी आपली दुकाने उभारली आहेत. शहराच्या मध्य ठिकाणी एस. टी.चे बसस्थानक आहे. शेजारीच ग्रामीण रुग्णालय आहे. तहसील, पंचायत समिती, पोलीस ठाणे अशी महत्त्वाची कार्यालये एकत्र असल्याने शासकीय कामे करण्याच्या दृष्टीने या भागात मोठ्या प्रमाणावर रहदारी असते. दोन वर्षांपूर्वी लांजा ग्रामपंचायतीचे रुपांतर नगर पंचायतीत झाले असले तरी नगरपंचायतीची निवडणूक झालेली नाही. मात्र, सध्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत.
लांजा - कुवे नगरपंचायतीत १७ प्रभाग असून, तहसीलदारांना हा कारभार पाहावा लागत आहे. पथदीप अंतर्गत रस्ते, कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्याच्या दृष्टीने जागा नाही. क्रीडांगण, नाना-नानी पार्क नसल्याने वृद्ध व तरुणवर्गाला याचा फटका बसला आहे. लांजा तालुका गेली अनेक वर्षे राजापूर व संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात विभागला गेला असल्याने विकासाचे प्रश्न प्रलंबित आहेत. त्यासाठी या तालुक्याला हक्काचा लोकप्रतिनिधी हवा, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.
तालुक्यात ९ धरणे असून, २ धरणांचे काम अनेक वर्षे अपूर्ण आहे. कालवे नसल्याने शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायम आहे. तालुक्यात औद्योगिक वसाहत नसल्याने तरुणांच्या हाताला काम मिळत नाही. पूर्वी दोन आमदार असताना विकास झाला नाही. मात्र, खुंटलेला विकास आता कधी होणार, असा प्रश्न पडला आहे.
राजापूर ते पाली महामार्गावर लांजा ग्रामीण रुग्णालय आहे. मात्र, तेथे अनेक गैरसोयी आहेत. ग्रामीण भागातील रुग्णांना शासकीय रुग्णालयाचा आधार असतो. मात्र, सुविधांचा अभाव असल्याने रुग्णांना खासगी रुग्णालयाचा पर्याय स्वीकारावा लागतो.
लांजा तालुक्यातून रेल्वे जात असली तरी निवसर व आडवली ही दोन्ही स्थानके प्रवाशांना सोयीची नाहीत. या ठिकाणी एस. टी.ची सुविधाही मर्यादित आहे. त्यामुळे त्याचा फटका प्रवाशांना बसत आहे. हर्चे, खानवली, साटवली, कुवे, वनगुळे या भागातील रेल्वे प्रवासी रत्नागिरीला जाणे पसंत करतात. तालुक्यातील रेल्वे स्थानक निवसरऐवजी आंजणारी येथे असते तर लांजा व पाली या ठिकाणच्या लोकांना फायदा झाला असता. मात्र, त्याचा फटकाच बसत आहे. आडवलीच्या बाबतीत वेरवली हा पर्याय योग्य होता. ही दोन्ही ठिकाणे भविष्यात रेल्वे स्थानकाच्या दृष्टीने पुढे आल्यास त्याचा विकासात महत्त्वाचा वाटा असेल.
तालुक्यातील माचाळ हे थंड हवेचे ठिकाण पर्यटनदृष्ट्या विकसित होणे गरजेचे आहे. माचाळ धनगरवाडीपर्यंत रस्ता झाला आहे. मात्र, पुढे रस्ता नसल्याने मैलोन्मैल चालत जावे लागते. आजारी पडल्यास त्याला डोलीतून पोचरी किंवा साखरपा या ठिकाणी न्यावे लागते. पर्यटनस्थळाच्या विकासासाठी लोकप्रतिनिधी व शासन या दोघांनी प्रयत्न करावेत.
तालुक्यात पाण्याची परिस्थिती गंभीर आहे. ९ गावांमध्ये ३० वाड्यांना एप्रिल महिन्यातच पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. त्यामुळे पाण्याचा प्रश्न सोडवणे आवश्यक आहे. राणी लक्ष्मीबाई हिचे सासर व माहेर लांजा तालुक्यात असल्याने तिचे भव्य स्मारक उभारण्यात येणे आवश्यक आहे. बसस्थानकाबाबत प्रश्न निर्माण झाले. येथे असलेली स्वच्छतागृहाची दुरवस्था आरोग्याला अपायकारक असल्याने सुधारणा होणे आवश्यक आहे. एक हायस्कूल व महाविद्यालयाची इमारत आहे. ग्रामीण भागातून विद्यार्थी या दोन्ही ठिकाणी मोठ्या प्रमाणात येतात. त्यामुळे इमारत विस्तारासाठी पुढाकार घेणे पूरक ठरणार आहे. क्रीडा, सांस्कृतिक विभागात विद्यार्थी नैपुण्य दाखवत असले तरी त्यांना मिळणाऱ्या सुविधा अल्प आहेत. क्रीडांगण, सांस्कृतिक केंद्र होणे आवश्यक आहे. लांजा तालुक्यात रस्ते, पाणी, धरणे, आरोग्य, पर्यटन, रेल्वे, एस. टी. बस, कचरा या महत्त्वाच्या प्रश्नांबरोबरच औद्योगिकदृष्ट्या येथे विकास होणे गरजेचे आहे.

लांजा तालुक्यात कृषी विकासाला चालना देणारे प्रकल्प आल्यास शेतकऱ्यांचा विकास होईल. मात्र, शासन दरबारी यासाठी आग्रह होत नसल्याची खंत साऱ्यांनाच आहे. झाशीची राणी लक्ष्मीबाई हिचे माहेर व सासर याच तालुक्यात असल्याने तिचे स्मारक पर्यटकांना प्रेरणा देऊ शकेल. मात्र, ते होण्यासाठी पुढाकार कोण घेणार. लांजाच्या माचाळ परिसराला देखणे निसर्गसौंदर्य आहे. पर्यटनाच्या नकाशावर हा परिसर येत असताना जगाच्या नकाशावर परिसर येण्यासाठी प्रयत्न व्हावेत.


महामार्गावरील लांजा हे महत्त्वाचे ठिकाण.
विकासाच्या प्रतीक्षेत असल्याने विस्ताराला वाव.
शासकीय कामे करण्यासाठी ग्रामीण भागातून येणाऱ्यांची संख्या अधिक.
९ पैकी २ धरणांचे काम अनेक वर्षे प्रलंबित.
विकासासाठी लोकप्रतिनिधी लांजाला कधी मिळणार.
औद्योगिक सुविधा कधी मिळणार.
माचाळच्या विकासाकडे लक्ष.

Web Title: The basic problem still was 'like'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.