थेट प्रसूतीसाठी आलेल्या मातेच्या मूलभूत चाचण्या आवश्यकच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:21 AM2021-06-23T04:21:06+5:302021-06-23T04:21:06+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : कुठलीही महिला प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल झाल्यानंतर तिची नोंद झाल्यानंतर लगेचच तिच्या मूलभूत चाचण्या सर्वप्रथम ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : कुठलीही महिला प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल झाल्यानंतर तिची नोंद झाल्यानंतर लगेचच तिच्या मूलभूत चाचण्या सर्वप्रथम केल्या जातात. तसेच आवश्यक असेल तर गर्भारपणाच्या सातव्या ते आठव्या आठवड्यापासून २८ आठवड्यांपर्यंत आवश्यकतेनुसार तिची किमान तीनवेळा सोनोग्राफी केली जाते. २४ आठवड्यांपर्यंत बाळात व्यंग दिसल्यास गर्भपात करून घेण्याचा अधिकार त्या मातेला असतो. मात्र, काही वेळा अगदी २५ व्या आठवड्यापर्यंतही व्यंग दिसत नाही. त्यामुळे डाॅक्टरांना नाइलाजाने प्रसूती करावी लागते.
कोरोना काळात जिल्हा शासकीय रुग्णालयात प्रसूतिकक्ष कोरोना रुग्णालयापासून स्वतंत्र ठेवण्यात आला आहे. प्रसूतीसाठी येणाऱ्या मातेचे बाळ गर्भाशयात आहे की त्या बाहेर आहे, हे पाहण्यासाठी पहिली सोनोग्राफी सातव्या किंवा आठव्या आठवड्यात होते. त्यांनतर ॲनॅमलिस स्कॅन ही सोनोग्राफी १८ ते २० व्या आठवड्यात होते आणि शेवटची २८ व्या आठवड्यात करावी लागते. सरकारी दवाखान्यात प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलेची कोरोना काळातही रक्तगट तपासणीसह अन्य सर्व महत्त्वाच्या चाचण्या करण्यात येत होत्या. त्याचबरोबर आवश्यकतेनुसार किमान तीन सोनोग्राफीही झाल्या. काही वेळा शेवटपर्यंत निदान न झाल्याने काही बाळांमध्ये व्यंग निर्माण झाले. मात्र, मातेच्या आणि बाळाच्या सुरक्षिततेेच्या दृष्टीने अशी प्रसूतीही डाॅक्टरांना करावी लागते.
मूलभूत चाचण्या आवश्यकच
महिला प्रसूतीसाठी आल्यानंतर तिच्या सर्व आवश्यक त्या चाचण्या आधी केल्या जातात. यात तिचे हिमोग्लोबिन तपासले जाते. हेपॅटायटीस बी साठी एच. बी. ए. जी., ए. आय. व्ही., लैंगिक आजारासंदर्भात व्ही. डी. आर. एल., रक्तगट, थायराॅईड, ग्लुकोज, आदी मूलभूत चाचण्या करणे महत्त्वाचे असते.
सोनोग्राफी ही उपचार पद्धती नाही तर ते निदान तंत्र आहे. प्रसूतीसाठी येणाऱ्या मातेची सुरक्षित प्रसूती व्हावी, बाळ निरोगी जन्माला यावे यासाठी सोनोग्राफी केली जाते. तसेच अन्य मूलभूत चाचण्या कराव्याच लागतात. काही वेळा २५ व्या आठवड्यात सोनोग्राफी केली तरीही बाळातील व्यंग दिसत नाही.
- डाॅ. राहुल सांगवेकर, प्रसूतितज्ज्ञ, जिल्हा रुग्णालय, रत्नागिरी