जिल्ह्यातील ‘सावित्रीच्या ६२६५ लेकीं’साठी दत्तक योजनेचा आधार
By admin | Published: March 9, 2015 09:29 PM2015-03-09T21:29:34+5:302015-03-09T23:54:12+5:30
--सावित्रीबाई फुले स्मृतिदिन
शोभना कांबळे - रत्नागिरी -पालकांच्या हलाखीच्या स्थितीमुळे मुलींच्या शिक्षणात खंड न पडता त्यांना सहायभूत ठरावी, या उद्देशाने महिलांना शिक्षणाचा हक्क मिळवून देणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावाने शासनाने सुरू केलेल्या दत्तक - पालक योजनेमुळे जिल्ह्यातील सावित्रीच्या ६२६५ लेकींना शिक्षणाचा हातभार मिळत आहे.
शिक्षणाचा प्रसार व्हावा, यासाठी शासनाने वेळोवेळी विविध योजना अमलात आणल्या आहेत. तरीही अनेक मुली, महिला शिक्षणाच्या हक्कापासून वंचित आहेत. याचे प्रमुख कारण म्हणजे त्यांच्या पालकांची हलाखीची स्थिती. हे लक्षात घेऊन मुलींच्या शिक्षणाला चालना मिळावी तसेच त्यांच्या शिक्षणासाठी हातभार लागावा, या उद्देशाने ज्यांनी स्त्री शिक्षणाची चळवळ निर्माण केली, स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या असलेल्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावाने शासनाने १९८३ - ८४मध्ये ‘सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना’ सुरू केली.
यामुळे समाजातून मुलींच्या शिक्षणाला हातभार लावण्यासाठी अनेक दाते पुढे येत आहेत. या मुलींना शैक्षणिकदृष्ट्या दत्तक घेऊन त्यांच्या शिक्षणाची ज्योत तेवत ठेवत आहेत. पहिली ते आठवीच्या ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या मागास, तसेच शहरातील झोपडपट्टीतील गरजू मुलींना अनुसूचित जाती, जमाती, भटक्या आणि विमुक्त जातीतील मुलींचा या योजनेसाठी प्राधान्याने विचार केला जातो.
आतापर्यंत या योजनेंतर्गत २ कोटी २० लाख ९६,००० एवढा निधी मुदत ठेव स्वरूपात जमा आहे. या मुदत ठेव स्वरूपात जमा झालेल्या रकमेतून दरमहा ३० रूपयेप्रमाणे दहा महिन्यांकरिता ३०० एवढी शैक्षणिक आर्थिक मदत दिली जाते.
ग्रामीण भागातील तसेच गरजू मुलींना शैक्षणिक सुविधा मिळणे कठीण असल्याने त्यांच्या पालकांना नाईलाजाने त्यांचे शिक्षण थांबवावे लागत होते. मात्र, आता त्यांना आर्थिक मदतीचा हातभार लावण्यासाठी शासनाने ‘सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना’ सुरू केल्याने आज सावित्रीच्या हजारो लेकी सन्मानाने शिकत आहेत.
या योजनेमुळे आर्थिक सहाय्याचा हात पुढे करणाऱ्या समाजातील अनेक व्यक्तींमुळे गरजू मुलींना शिक्षण सोपे झाले आहे. जिल्ह्यात २०१४ - १५ या कालावधीत या योजनेचा लाभ पहिली ते आठवीतील एकूण ६२६५ गरजू विद्यार्थिनीना मिळाला. सर्वाधिक लाभ खेड तालुक्यातील १०१९ विद्यार्थिनीना मिळाला आहे. नगरपरिषदेच्या शाळांमधील ६७ विद्यार्थिनींनाही याचा लाभ मिळाला. आहे. या योजनेसाठी १८ लाख ७९ हजार ५०० इतकी रक्कम वितरीत करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
तालुकासंख्यारक्कम
मंडणगड३७७१,१३,१००
दापोली७६०२,२८,०००
खेड१०१९३,०५,७००
चिपळूण७१०२,१३,०००
गुहागर४५३१,३५,९००
संगमेश्वर९४०२,८२,०००
रत्नागिरी८३९२,५१,७००
लांजा३९०१,१७,०००
राजापूूर७१०२,१३,०००
नगरपरिषद६७२०,१००
एकूण६२६५१८,७९,५००
शासनाने १९८३ - ८४मध्ये सुरु केली ‘सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना’.
आर्थिक सहाय्याचा हात पुढे करणाऱ्या समाजातील अनेक व्यक्तींमुळे गरजू मुलींना शिक्षण सोपे.
पालिकेच्या शाळांमध्येही मिळाला लाभ.