रत्नागिरीतील या खलाशानं तब्बल 20 तास दिली खवळलेल्या समुद्राशी झुंज
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2017 06:53 PM2017-09-20T18:53:59+5:302017-09-20T18:56:14+5:30
रत्नागिरीतील दापोली तालुक्यामधील आंजर्ले खाडीत मंगळवारी पाच नौका बुडाल्या. आंजर्ले खाडीत बुडालेल्या नौकेवरील खलाशी फुलचंद भय्या हा किनाऱ्यावर सुखरूप परतला आहे.
रत्नागिरी, दि. 20 - वादळसदृश वारे आणि उसळत्या लाटांच्या माऱ्याचा सामना करत फुलचंद भय्या हा आंजर्ले खाडीत बुडालेल्या नौकेवरील खलाशी किनाऱ्यावर सुखरूप परतला आहे. सोमवारी दुपारी आंजर्ले खाडीमध्ये पाच नौका बुडाल्या. त्यावरील दहा खलाशी स्थानिकांच्या मदतीने सुखरूप किनाऱ्यावर आले. मात्र फुलचंद भय्या, त्याचा भाऊ दीपचंद भय्या आणि कैलाश जुवरकर हे तीन खलाशी बेपत्ता होते. यातील फुलचंद भय्या याच्या हाती बोट बुडतानाच एक बोया लागला. तो धरून ठेवत फुलचंदने तब्बल २० तास समुद्राशी सामना केला. बुधवारी ( 20 सप्टेंबर ) सकाळी तो बोयाच्या सहाय्याने पोहत किनाऱ्यावर आला.
उर्वरित बेपत्ता खलाशांपैकी एकाचा मृतदेह दापोलीनजिकच्या कर्दे समुद्रकिनारी सापडला आहे. त्याची ओळख अजून पटलेली नाही. तिसरा खलाशी अजूनही बेपत्ता असून, त्याच्या शोधासाठी तटरक्षक दलाचे हेलिकॉप्टर दाखल झाले आहे.
नेमके काय घडले?
दापोली किनाऱ्याच्या विविध बंदरात नांगरून ठेवलेल्या पाच मच्छिमारी नौका या वाऱ्याच्या तडाख्याने उलटल्या. यामधील 21 हून अधिक जणांना वाचवण्यात यश आलं असून एका खलाशाचा मृतदेह हाती लागला आहे. त्यातील एक बोट समुद्रात हेलकावे खात असताना ती कॅमेऱ्यात कैद झाली. या बोटीत काही मच्छिमार होते. पण बोट जोरदार हेलकावे खात असल्यानं या बोटीवरील सर्वच मच्छिमारांनी थेट समुद्रात उड्या मारल्या. त्यामुळे त्यांचे प्राण वाचले.
यातील बहुतांश खलाशांनी पोहत बाहेर येत आपले प्राण वाचवले. हर्दे येथील रामचंद्र जोमा पाटील यांची भक्ती, हरीश्चंद्र पाटील यांची गगनगीरी तर भारत पेडणेकर व संतोष पावसे यांच्या बोटी लाटांच्या तडाख्याने उलटल्या. यामुळे बोटींचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
केवळ दैव बलवत्तर म्हणून 20 हून अधिक जणांचे प्राण वाचले आहेत. रामचंद्र पाटील यांच्या बोटीवरील सात खलाशांपैकी पाच खलाशांना वाचवण्यात यश आले असून एक खलाशी अजूनही बेपत्ता आहे. त्यांचा शोध सुरू आहे. तर एकाचा मृतदेह हाती लागला आहे. दरम्यान एनडीआरएफची एक टीम पुण्याहून दापोलीकडे रवाना करण्यात आली आहे.