नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी सतर्कता बाळगावी

By admin | Published: May 25, 2016 10:27 PM2016-05-25T22:27:46+5:302016-05-25T23:27:04+5:30

प्रदीप पी. यांची सूचना : प्रत्येक विभागात नियंत्रण कक्ष स्थापन करावा

Be alert to face natural disaster | नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी सतर्कता बाळगावी

नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी सतर्कता बाळगावी

Next

रत्नागिरी : पावसाळ्यात उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी शासकीय यंत्रणांनी सतर्क राहावे, तसेच सर्व यंत्रणांनी आपल्याकडील यंत्रसामुग्री सुस्थितीत ठेवून मनुष्यबळाचे नियोजन करावे आणि आपल्यावर सोपवलेली जबाबदारी चोखपणे पार पाडावी. पावसाळ्यात प्रत्येक विभागात नियंत्रण कक्ष स्थापन करावा, अशी सूचना जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात मान्सून पूर्व तयारीच्या अनुषंगाने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक आयोजित केली होती. यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. बैठकीला सहाय्यक जिल्हाधिकारी विजय राठोड, परिविक्षाधिन अधिकारी पाटणकर, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद पुसावळे, निवासी उपजिल्हाधिकारी सारंग कोडोलकर तसेच विविध शासकीय, निमशासकीय खात्यांचे प्रमुख उपस्थित होते.
पावसामुळे दरड कोसळण्याचे प्रकार होत असतात. दरड कोसळून रस्ता बंद झाल्यास तो तातडीने पूर्ववत करण्यासाठी बांधकाम विभागाने सज्जता ठेवावी. तसेच दरड कोसळण्याचा धोका असणाऱ्या गावांचे सर्व्हेक्षण करुन किती घरे, व्यक्ती बाधित होतील, याची संभाव्य आकडेवारी तयार करून त्यावरील उपाय याचा अहवाल संबंधित यंत्रणांनी सादर करावा. आपत्ती काळात तातडीने मदत पोहचवण्याच्या दृष्टीने प्रत्येक तालुक्यात शीघ्र कृती दल (क्वीक अ‍ॅक्शन टीम) तयार करावे, अशा सूचनाही जिल्हाधिकारी यांनी दिल्या.
या टीममध्ये महसूलसह बांधकाम, आरोग्य, पोलीस, महावितरणचे कर्मचारी, रुग्णवाहिका यांचा समावेश असेल. या टीमच्या माध्यमातून आपत्तीग्रस्त ठिकाणी तातडीने मदत पोहचवण्याची सज्जता ठेवण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील आपत्तीची माहिती तातडीने मिळण्यासाठी गावपातळीवर पोलीसपाटील, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांची त्या त्या स्तरावर संबंधित यंत्रणेने बैठका घेऊन त्यांना सूचना द्याव्यात, असेही ते म्हणाले.
नगरपालिका, नगरपंचायती, पंचायत समित्या यांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील नदी नाल्यांची स्वच्छता करुन घ्यावी. तसेच पाण्यापासून उद्भवणारे आजार टाळण्यासाठी आपापल्या क्षेत्रातील पाण्याचे क्लोरिनेशन करण्यात यावे, त्याचप्रमाणे नगरपरिषदांनी कीटकनाशके फवारणी जास्तीत जास्त वेळा करावी, अशा सूचनाही प्रदीप पी. यांनी दिल्या. इतर विभागांनीही आपापल्या क्षेत्रात मान्सूनपूर्व कामांची पूर्तता करावी आणि आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तिचा सामना करण्यास आपली यंत्रणा सज्ज ठेवावी, असे सांगितले. यावेळी सर्व विभागांनी आपत्ती व्यवस्थापन आराखड्याबाबत माहिती दिली. आपत्ती व्यवस्थापन विभागाकडूनही पॉवर पॉर्इंट प्रेझेंटेशनद्वारे आपत्ती व्यवस्थापन आराखड्याची माहिती देण्यात आली. (प्रतिनिधी)

Web Title: Be alert to face natural disaster

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.