सावध, ऐका पुढल्या हाका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:37 AM2021-08-18T04:37:45+5:302021-08-18T04:37:45+5:30
कोरोना रुग्णसंख्या घटू लागलीय, त्यामुळे कोरोनाच्या अनुषंगाने घालण्यात आलेले बहुतांशी निर्बंध आता हळूहळू उठविण्यात आले आहेत. मात्र, सर्व व्यावसायिक, ...
कोरोना रुग्णसंख्या घटू लागलीय, त्यामुळे कोरोनाच्या अनुषंगाने घालण्यात आलेले बहुतांशी निर्बंध आता हळूहळू उठविण्यात आले आहेत. मात्र, सर्व व्यावसायिक, नागरिकांना निर्बंध उठल्याने मोकळे वाटत असले तरीही गेल्या वर्षीचा कोरोनाचा अनुभव लक्षात ठेवायला हवा. त्याची पुनरावृत्ती होणार नाही, याची काळजी घ्यायला हवी. गेल्या वर्षी कोरोनाचे संकट आरोग्य क्षेत्रालाही नवीन होते. त्यामुळे याविषयी काय निर्णय घ्यायला हवा, याबाबत शासन आणि प्रशासनही गोंधळलेले होते. त्यामुळे ज्या ज्या वेळी कोरोनाचे रुग्ण कमी झाल्यानंतर निर्बंध उठले, त्यानंतर कोरोना रुग्णांची संख्या भरमसाठ वाढू लागली आणि त्याचबरोबर मृत्यू होणाऱ्यांची संख्याही वाढली होती, हा अनुभव विसरता कामा नये.
गेल्या वर्षी मे महिन्यात मुंबईहून गावी परतलेल्या चाकरमान्यांमुळे रुग्णसंख्या वाढली. ती नियंत्रणात आणताना आरोग्य विभागाची दमछाक झाली. त्यातच ऑगस्ट महिन्याच्या शेवटी गणेशोत्सवात अधिकच निर्बंध उठविण्यात आले. त्यामुळे जिल्हाबंदी उठली आणि सात पाच महिने बंद असलेली रेल्वे, एसटी बसेस, खासगी वाहने सुरू झाली. साहजिकच पुन्हा गणपती सणासाठी मुंबईकर गावात दाखल झाले. येताना कोरोनाची भेटही घेऊन आले. त्यामुळे पुन्हा कोेरोनाचा विस्फोट झाला. गत वर्षी सप्टेंबर महिना हा कोरोना विस्फोट ठरला.
गत वर्षीची पुनरावृत्ती यावर्षीही होत आहे. मार्च महिन्यात शिमग्यात आलेल्या मुंबईकरांनी येताना कोरोना सोबत आणला. त्याचा संसर्ग एवढा वाढला की, वर्षभरात साडेदहा हजार रुग्णांची नोंद झाली होती. मात्र, गेल्या ५ महिन्यांत ६२ हजारांपेक्षाही अधिक रुग्ण या काळात नाेंदविले गेले आणि जवळपास १७०० रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आता आणखी काही दिवसांत गणेशोत्सव येत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन आणि त्याच्या आराेग्य विभागाला जेरीला आणल्यानंतर आता कुठे रुग्णसंख्या आटोक्यात येतेय, ती पुन्हा वाढण्याचा धोका समोर आहे. सध्या कोरोनाची दुसरी लाट हळूहळू कमी होतेय, याचा अर्थ असा नव्हे की, कोरोना कायमचा संपणार आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेची पुनरावृत्ती टाळून जर दुसरी लाट संपली, तर तिसऱ्या लाटेला थोपविणे शक्य होईल. पहिल्या लाटेवेळी तिचे परिणाम फारसे कुणालाच माहीत नव्हते. मात्र, योग्य खबरदारी घेतली, तर आपण स्वत: सुरक्षित राहू आणि आपल्या संपर्कात येणारे आपले कुटुंबीय, नातेवाईक, मित्र परिवार, तसेच आपल्या कामाच्या ठिकाणी असलेले सहकारी यांनाही आपण सुरक्षित ठेवू. म्हणूनच निर्बंध उठविले गेले म्हणजे आपण सुरक्षित आहोत, असे नव्हे. गाफीलपणा पुन्हा तिसऱ्या लाटेच्या संकटात टाकेल. आद्यकवी केशवसुत यांच्या ‘तुतारी’ या प्रसिद्ध कवितेतील सावध, ऐका पुढल्या हाका, या पंक्तींप्रमाणे निर्बंध उठले म्हणून गणेशोत्सवासह अन्य येणाऱ्या सणांवेळी योग्य खबरदारी घेतली नाही, तर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला थोपविताना आरोग्य यंत्रणेसह प्रशासनाचीही दमछाक होईल.