रत्नागिरीतील समुद्रकिनारे ठरतायत पर्यटकांचे आकर्षण, वाॅटर स्पोर्ट्साठी पसंती

By मेहरून नाकाडे | Published: May 24, 2024 07:28 PM2024-05-24T19:28:03+5:302024-05-24T19:28:21+5:30

मेहरून नाकाडे रत्नागिरी : अथांग समुद्र, किनाऱ्यावरील वाळूवरील खेळ, समुद्राच्या लाटा त्या अंगावर घेत केली जाणारी माैजमजा, शिवाय वाॅटर ...

Beaches in Ratnagiri are the tourist attractions | रत्नागिरीतील समुद्रकिनारे ठरतायत पर्यटकांचे आकर्षण, वाॅटर स्पोर्ट्साठी पसंती

रत्नागिरीतील समुद्रकिनारे ठरतायत पर्यटकांचे आकर्षण, वाॅटर स्पोर्ट्साठी पसंती

मेहरून नाकाडे

रत्नागिरी : अथांग समुद्र, किनाऱ्यावरील वाळूवरील खेळ, समुद्राच्या लाटा त्या अंगावर घेत केली जाणारी माैजमजा, शिवाय वाॅटर स्पोर्ट्स, झीपलाईन, पॅरासेलिंग, स्कूबा ड्रायव्हिंगमुळे पर्यटकांची पावले रत्नागिरी तालुक्यात वळत आहेत. तालुक्यातील गणपतीपुळे, मालगुंड, वरवडे, काजिरभाटी, आरे-वारे, मांडवी, भाट्ये, झरीविनायक, पूर्णगड, गणेशगुळे, गावखडी या समुद्रकिनाऱ्यांना पर्यटकांची सर्वाधिक पसंती मिळत आहे.

श्रीक्षेत्र गणपतीपुळे, पावस येथील स्वामी स्वरूपानंद मंदिर, गणेशगुळेचे गणपती मंदिर ही प्रमुख देवस्थाने असून, या ठिकाणी भक्तांची गर्दी होते. समुद्रकिनाऱ्याचे पर्यटकांना विशेष आकर्षण असल्यामुळे भाविक धार्मिक स्थळांना भेटी देण्याच्या निमित्ताने आजूबाजूच्या समुद्रकिनाऱ्यावर गर्दी करत असतात. समुद्रस्नान हा आवडीचा भाग. याच्या जोडीला किनाऱ्यावर कुटुंबातील सदस्यांबरोबर खेळ रंगतात. त्याचबरोबर वाॅटर स्पोर्ट्स, झीपलाईन, पॅरासेलिंग, स्कूबा ड्रायव्हिंगचाही आस्वाद पर्यटक घेतात.

वाॅटर स्पोर्ट्साठी पसंती

समुद्रकिनाऱ्यावर उसळणाऱ्या लाटा अंगावर घेत समुद्रस्नानाचा आनंद घेतला जातो. पर्यटकांसाठी जलक्रीडांचे विविध प्रकार उपलब्ध असून, पर्यटक याचा आस्वाद घेतात. वाॅटर स्पोर्ट्सबरोबर स्कूबा ड्रायव्हिंगमध्ये समुद्राच्या अंतर्भागाचे साैंदर्य पाहता येते. पॅरासेलिंग, झीपलाईन मात्र धाडसी पर्यटक करू शकतात. मात्र, ते पाहण्यासाठीही पर्यटकांची गर्दी होत असते.

शांत किनाऱ्यांची निवड

गणपतीपुळे, मांडवी, भाट्ये किनाऱ्यावर प्रचंड गर्दी असते. हल्ली आरेवारे, काजिरभाटी बिचेसवरही गर्दी वाढू लागली आहे. गर्दीमध्ये जाण्याचा कंटाळा करणाऱ्या पर्यटकांची पावले पूर्णगड, गणेशगुळे, गावखडी समुद्राकडे वळू लागली आहे. पर्यटकांसह स्थानिकही वनडे पिकनिकसाठी या ठिकाणांची निवड करत आहेत. सुटी तसेच वीकेंडला या बिचेसवरही गजबज अधिक असते.

सुविधांची वानवा

जिल्ह्यात पर्यटनासाठी येणारा पर्यटक केवळ एक ठिकाण किंवा एका मंदिरात दर्शन घेत माघारी फिरत नाहीत. आसपासची मंदिरे, किनारे एकूणच प्रेक्षणीय स्थळांना भेटी दिल्या जातात. हल्ली समुद्रकिनाऱ्यांवर खाद्यपदार्थ विक्री, खेळणी विक्री, शहाळी विक्री, अंघोळीसाठी पाणी या व्यवसायांना सुगीचे दिवस आले आहेत. वास्तविक, संबंधित गावांतील स्थानिक स्वराज्य संस्थांनी पर्यटकांसाठी प्रशासनगृहे, विजेची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था किनाऱ्यांवर उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे. मात्र, त्याकडे स्थानिक स्वराज्य संस्थांचे दुर्लक्ष होत आहे.

वन डे सहल

सांगली, सातारा, कोल्हापूर या लगतच्या जिल्ह्यांतून अनेक पर्यटक एक दिवसाच्या सहलीसाठी तालुक्यात येतात. पहाटे घराबाहेर पडतात. दिवसभरात जेवढ्या पर्यटनस्थळाला भेट देऊन सायंकाळी मागे फिरतात. एक दिवसाच्या सहलीसाठी येणाऱ्या पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. रिक्षा टेम्पो, जीप, कार, ट्रॅव्हलर याशिवाय दुचाकीने पर्यटक येत आहेत. हे पर्यटक निवासासाठी येत नसल्यामुळे लाॅजिंगची आवश्यकता भासत नाही. मात्र, नाष्टा, भोजन करतात. त्यामुळे या पर्यटकांकडूनही नुकसान नसले तरी फायदा सुद्धा नक्की नाही.

आंबा खरेदी

मधुर स्वाद, अविट गोडी या गुणधर्मांनी युक्त हापूसची भुरळ सर्वांनाच आहे. त्यामुळे उन्हाळ्यात येणाऱ्या पर्यटकांकडून आंबा खरेदी आवर्जून केली जाते. महामार्गावरही विक्रीचे स्टाॅल उपलब्ध आहेत. आंब्यासह काजूगर, ओले काजू, फणस, करवंद, जांभळांचीही खरेदी केली जाते.

रत्नागिरी तालुक्यात काय पाहाल?

  • श्रीक्षेत्र गणपतीपुळे
  • श्री स्वामी स्वरूपानंद मंदिर, पावस
  • गणेशगुळे येथील गणपती मंदिर
  • रत्नदुर्ग किल्ला व श्री भगवती देवीचे मंदिर
  • श्री काळभैरव मंदिर, रत्नागिरी
  • थिबा राजवाडा
  • लोकमान्य टिळक जन्मस्थान
  • भाट्ये किनारा व झरीविनायक मंदिर
  • मांडवी किनारा
  • आरेवारे व काजिरभाटी समुद्रकिनारा
  • पूर्णगड, गावखडी बीच
  • छत्रपती संभाजी महाराजांचा सर्वात उंच पुतळा
  • श्री विठोबाचा पुतळा

Web Title: Beaches in Ratnagiri are the tourist attractions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.