खंडणीची मागणी करून प्राेजेक्ट मॅनेजरला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:31 AM2021-05-14T04:31:44+5:302021-05-14T04:31:44+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क राजापूर : ग्रामीण भागात महानेट कंपनीचे इंटरनेट केबलचे काम करणाऱ्या दर्शन इंटरप्रायझेस आणि शिलिकॉन केअर ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
राजापूर :
ग्रामीण भागात महानेट कंपनीचे इंटरनेट केबलचे काम करणाऱ्या दर्शन इंटरप्रायझेस आणि शिलिकॉन केअर या कंपनीच्या प्रोजेक्ट मॅनेजरकडे शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याने एक लाखाची खंडणी मागितल्याची घटना ताजी असतानाच याच कंपनीच्या कामात अडथळा आणून याच प्रोजेक्ट मॅनेजरकडे खंडणीची मागणी करून त्याला मारहाण केल्याप्रकरणी नाटे पोलिसांनी चार जणांविरोधात गुन्हा दाखल करून अटक केली आहे. त्यांना राजापूर न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालायाने त्या चौघांनाही १५ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
याप्रकरणी दर्शन इंटरप्रायझेस आणि शिलिकॉन केअर या कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर लक्ष्मणराव दशरथ सूर्यवंशी (रा. खेर्डेवाडी, ता. कडेगाव, जि. सांगली) यांनी नाटे पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीनुसार रूपेश सर्जेराव मोहिते (२६ रा. दळे, ता. राजापूर), पद्नाथ उर्फ पिंट्या विलास कोठारकर (३५ रा. धाऊलवल्ली, राजापूर), संतोष उर्फ बाबू सन्मुख तोडणकर (४४, रा. गावखडी, रत्नागिरी) व सर्जेराव नारायण मोहिते (५२ रा. दळे सडेवाडी, राजापूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती नाटे पाेलिसांनी दिली.
दर्शन इंटरप्रायझेस आणि शिलिकॉन केअर या कंपनीचे केबल नेटवर्कींगचे काम सध्या सागवे, अणसुरे, कुवेशी, दळे या ठिकाणी सुरू आहे. या ठिकाणी काम सुरू असताना समीर शिरवडकर, पिंट्या कोठारकर हे काम करावयाचे असेल तर आम्हाला पैसे द्यावे लागतील, असे बोलून काम थांबवत होते. तसेच फोनवर वारंवार पैशाची मागणी करत होते.
याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातील राहुल बच्चाव यांना माहिती देण्यात आली हाेती. त्यानंतर राहूल बच्चाव यांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे बैठक घेऊन चर्चाही केली हाेती़ तरीही त्यांनी पैशाची मागणी सुरूच केली हाेती़ ११ मे २०२१ रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या दरम्यान कुवेशी येथून कामावरून राजापूरकडे येत असताना कुवेशी तिठा येथे रूपेश मोहिते व सर्जेराव मोहिते यांनी पाेकलॅडचे देण्यात येणारे भाडे होते त्यापेक्षा जास्त पैशाची मागणी केली. तसेच कंपनी मालक दत्ता सातपुते यांना व आशिष अबनावे यांना फोन करून अकाऊंटला ६० हजार रूपये टाका अशी धमकी दिली. त्यावेळी कंपनीने पैसे देण्यास नकार दिला. त्यावेळी त्यांनी बाबू तोडणकर, पिंट्या कोठारकर यांना बोलावून घेऊन मला शिवीगाळ करून मारहाण केली. त्यावेळी रूपेश मोहिते यांच्या बँक खात्यावर ६० हजार रूपये एनएफटीद्वारे टाकल्याचा स्क्रीन शॉट दाखविल्यानंतर मला रात्री ८ वाजता सोडले असे फिर्यादीत म्हटले आहे.
त्यानंतर बाबू तोडणकर यांनीही पैशाची मागणी केली़ या प्रकरणी सूर्यवंशी यांच्या तक्रारीवरून नाटे पोलीसांनी या चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी नाटे सागरी पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील अधिक तपास करत आहेत.