साेशल डिस्टन्सिंगवरून दोन गटांत मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:30 AM2021-05-01T04:30:50+5:302021-05-01T04:30:50+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : सोशल डिस्टन्सिंग ठेवून नमाज अदा कर, असे सांगितल्यानंतर याचा राग येऊन झालेल्या वादात दोन ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : सोशल डिस्टन्सिंग ठेवून नमाज अदा कर, असे सांगितल्यानंतर याचा राग येऊन झालेल्या वादात दोन गटांत मारहाण झाल्याची घटना तालुक्यातील आकले-तळेवाडी मोहल्ला येथे बुधवारी घडली. याप्रकरणी परस्परविरोधी फिर्याद देण्यात आल्या असून, त्यानुसार सहाजणांविरोधात आलोरे-शिरगाव पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात पाचजण जखमी झाले आहेत.
यासीन सुलेमान चोगले, अनिस यासिम चोगले, नयिन यासिम चोगले (सर्व-आकले-तळेवाडी मोहल्ला), अब्दुलगणी सुलेमान चोगले (कादवड) अशी एका गटातील तर बशीर अल्लाउद्दीन चोगले, अल्लाउद्दीन युसुफ चोगले (दोघे-आकले-तळेवाडी मोहल्ला) अशी दुसऱ्या गटातील गुन्हा दाखल झालेल्यांची नाव आहेत. याप्रकरणी एका गटातील सलमान अल्लाउद्दीन चोगले (२७, आकले-तळेवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सलमान चोगले यांचे वाडील व भाऊ बशीर हे रमजान रोजे असल्याने सार्वजनिक नमाज पडण्याच्या ठिकाणी मौलाना अहमद खेरटकर यांच्या उपस्थितीत सोशल डिस्टन्सिंग ठेवून नमाज पठण करत असताना यासीन चोगले व मुजिम दिलावर चोगले हे देखील नमाज पठणाकरिता आले होते. यावेळी सलमान चोगले यांचा भाऊ बशीरने त्यांना अंतर ठेवून नमाज पठण करण्यास सांगितले. त्याचा राग यासीन चोगले, अनिस चोगले, नयिस चोगले, अब्दुलगनी चोगले याना आल्याने त्यांनी शिवीगाळ करत तुम्हाला बघून घेतो, अशी दमदाटी करून ठार मारण्याची धमकी दिली तसेच त्यांनी सलमान चोगले यांच्यासह अल्लाऊद्दीन चोगले, आजिदा चोगले, बशीर चोगले यांना संगनमताने बांबूने तसेच हाताने मारहाण केली. त्यात ते जखमी झाले आहेत.
तसेच दुसऱ्या गटातील यासिन सुलेमान चोगले (४६, आकले तळेवाडी मोहल्ला) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार २८ रोजी रात्री ८ वाजता नमाज पठण करण्याकरीता आकले मोहल्ल्यातील मशीदमध्ये गेला असता त्याठिकाणी बशीर चोगले, अल्लाउद्दीन चोगले तसेच मुजिम दिवालकर चोगले यांच्यात सोशल डिस्टन्सिंग ठेवण्यावरून वाद सुरू होता. यावेळी यासिन चोगले यांनी त्यांना मशीद हे सार्वजनिक प्रार्थनास्थळ आहे. रमजान महिना चालू आहे. येथे भांडणे करणे योग्य नाही, असे सांगितले. त्याचा राग मनात धरून नमाज पठण झाल्यानंतर संगनमताने यातील बशीर चोगले, अल्लाउद्दीन चोगले यांनी लाकडी दांड्याने त्यांना मारहाण केली. यात ते जखमी झाले आहेत.