नीलिमा चव्हाण खून प्रकरण: बेपत्ता होण्याआधी नीलिमाचे लोकेशन होते कोंडिवली धरण, मृत्यूचे गूढ कायम
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2023 11:41 AM2023-08-05T11:41:39+5:302023-08-05T11:42:01+5:30
खेड स्थानकात तिने चिपळूणला जाणारी बस पकडल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे
दापोली : घरी जाण्यासाठी निघालेली नीलिमा बेपत्ता झाली आणि दोन दिवसांनी तिचा मृतदेह सापडला. ज्या दिवशी ती बेपत्ता झाली, त्या दिवशी तिचा मोबाइल खेड तालुक्यातील कोंडिवली धरण परिसरात होता. तेथे ती कशी गेली, तिच्यासोबत कोण हाेते, तिचा मृतदेह दाभोळ खाडीत कसा गेला, यांसारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे अजून सापडलेली नाहीत. चार दिवस झाले तरी नीलिमाच्या मृत्यूचे गूढ कायम आहे.
चिपळूण तालुक्यातील ओमळी येथील रहिवासी असलेली नीलिमा चार महिन्यांपूर्वीच दापोलीतील स्टेट बँकेत कंत्राटी कर्मचारी म्हणून कामाला लागली होती. तेथे ती एका खासगी वसतिगृहात राहत होती. शनिवार आणि रविवार असे दोन दिवस सुटी असल्याने आपण गावी येत असल्याचे तिने शुक्रवारी (दि. २८ जुलै) आपल्या भावाला फोनवरून कळविले. त्यानुसार शनिवार २९ रोजी सकाळी ती दापोलीहून एस.टी. बसने खेडला निघाली. खेड स्थानकात तिने चिपळूणला जाणारी बस पकडल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे.
चिपळूणला जाण्यासाठी निघालेली नीलिमा चिपळूणपर्यंत पोहोचलीच नाही. त्यानंतर दिवसभर तिच्या मोबाइलचे लोकेशन कोंडिवली धरण परिसरात असल्याचे पोलिसांच्या तपासात पुढे आले आहे. त्यानंतर तिचा मोबाइल बंद झाला.
नीलिमाच्या नातेवाइकांनी तिला दापोली, खेड, चिपळूण परिसरात शोधले. मात्र, तिचा ठावठिकाणा लागला नाही. अखेर मंगळवारी, दि. १ ऑगस्टला तिचा मृतदेह दाभोळ खाडीमध्ये सापडला. तिच्या डोक्यावरील केस व भुवया मशीनने काढून टाकण्यात आल्या असल्याचे स्पष्ट झाले आहे. ते पाहता हा घातपातच असल्याचा नातेवाइकांचा दाट संशय आहे. तिचा मृत्यू कशामुळे झाला, हा घातपात आहे का, असेल तर यागामे कोण आहे, याचा शोध घेण्याची मागणी नाभिक समाज संघाने केली आहे.
उत्तरे नसलेले अनेक प्रश्न
खेड बसस्थानकात चिपळूणला जाणारी गाडी पकडणारी नीलिमा कोंडिवली धरण परिसरात कशी गेली? तिच्यासोबत कोण होते? ती स्वत:हून गेली असेल तर तिच्यासोबतची व्यक्ती तिच्या ओळखीची असणार. ती व्यक्ती कोण होती? कोंडिवली धरण परिसरात तिचे शेवटचे लोकेशन दिसत असताना तिचा मृतदेह दाभोळ खाडीत कसा सापडला? यासह अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यांची उत्तरे अजून स्पष्ट झालेली नाहीत.
तेव्हाच शोधले असते तर...
शनिवारी नीलिमा बेपत्ता झाली तेव्हा तिचे लोकेशन कोंडिवली, अंजनी धरण दिसत होते. शनिवारी रात्रीपर्यंत तेच लोकेशन असल्याची माहिती पुढे येत आहे. तिच्या भावाने पोलिसांची मदत मागितली होती. त्याच वेळी पोलिसांनी तत्परता दाखवून शोध घेतला असता तर कदाचित तिचा जीव वाचला असता. परंतु, पोलिसांनी सहकार्य केले नाही. त्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचा आरोपही नातेवाईक करीत आहेत.
सहा पथकांमार्फत तपास
दापोली पोलिस स्थानकात आत्महत्या म्हणून प्रथम हे प्रकरण दाखल झाले. मात्र, समाजाच्या रेट्यामुळे आता हा प्रकार नेमका काय आहे, याचा तपास सुरू झाला आहे. दापोली, खेड, चिपळूण या तीन ठिकाणी सहा पथकांच्या माध्यमातून नीलिमाच्या मृत्यूचा तपास केला जात आहे. आता पोलिसांनी या चौकशीला अधिक गती दिली आहे.