परशुराम घाटातील चौपदरीकरणास सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2021 04:51 PM2021-12-23T16:51:22+5:302021-12-23T16:51:37+5:30

चिपळूण : गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गावरील पेढे परशुराम घाटातील चौपदरीकरणाचे काम २३ डिसेंबर रोजी सकाळी ८.३० वाजल्यापासून ...

Beginning of quadrangle in Parashuram Ghat | परशुराम घाटातील चौपदरीकरणास सुरुवात

परशुराम घाटातील चौपदरीकरणास सुरुवात

Next

चिपळूण : गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गावरील पेढे परशुराम घाटातील चौपदरीकरणाचे काम २३ डिसेंबर रोजी सकाळी ८.३० वाजल्यापासून सुरू होणार आहे. तत्पूर्वी बुधवारी पेढे परशुराम संघर्ष समितीच्या उपस्थितीत झालेल्या सर्वेक्षणात ग्रामस्थांनी अनेक बाबी समजून घेतल्या. मात्र भगवान परशुराम मंदिराकडे जाणाऱ्या मार्गाच्या ठिकाणी उड्डाणपूल की सर्कल तयार करायचा यावरून नवा वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दोन दिवसांपूर्वी प्रांताधिकारी प्रवण पवार यांनी तहसीलदार, राष्ट्रीय महामार्गचे अधिकारी, दोन्ही ठेकेदार कंपन्या, पेढे परशुराम संघर्ष समिती, उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस निरीक्षक आदींची संयुक्त बैठक घेतली. बैठकीला जनहित याचिका दाखल करणारे उच्च न्यायालयाचे ॲड. ओवेस पेचकर हेही उपस्थित होते. या बैठकीत पेढे परशुराम संघर्ष समितीने चौपदरीकरणास सहमती दर्शवल्याने चार वर्षांपासून रखडलेल्या या कामाचा मार्ग मोकळा झाला आहे. समितीच्यावतीने उच्च न्यायालयाचे ॲड. ओवेस पेचकर यांनी बाजू मांडली व संबंधित ग्रामस्थांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारीही स्वीकारली.

काम सुरू करण्यापूर्वी बुधवारी कल्याणी टोलवेज, चेतक ईगल इन्फा या दोन्ही कंत्राटदार कंपन्याचे तसेच महामार्गाचे अधिकारी, संघर्ष समिती, सरपंच यांच्या उपस्थितीत जागेचे सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात सवतसडा धबधबा येथे व पेढे येथून मंदिराकडे जाण्यासाठी पाखाडीसह काही सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचे ठरले. त्यानंतर परशुराम येथे पाहणी केली असता तेथील काही दुकानदारांनी उड्डाणपूल ऐवजी सर्कल उभारण्याची मागणी केली, तर काही ग्रामस्थ उड्डाणपुलाच्या मागणीवर ठाम होते. त्यामुळे याविषयी ग्रामस्थांनी एकमुखाने निर्णय द्यावा, त्याप्रमाणे काम केले जाईल, असे ठरले. तूर्तास चौपदरीकरणाच्या कामाला सुरुवात केली जाणार असून, त्याला ग्रामस्थांनी हिरवा कंदील दाखवला आहे. तरीही उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार पोलीस बंदोबस्तात हे काम सुरू केले जाणार आहे.

यावेळी महामार्गचे उपविभागीय अभियंता रोजर मराठे, पेढे सरपंच प्रवीण पाकळे, परशुरामचे गजानन कदम, संघर्ष समितीचे विश्वास सुर्वे, सुरेश बहुतले, दीपक मोरे, संतोष चोपडे, जनार्दन मालवणकर, अभय सहस्रबुद्धे, प्रकाश काजवे, पांडुरंग येसरे, प्रसाद थत्ते, गोपीनाथ रेपाळ आदींसह ३० हून अधिक ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: Beginning of quadrangle in Parashuram Ghat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.