हुलकावणी देणाऱ्या यशाने जिद्दीपुढे झुकवली मान

By admin | Published: May 20, 2016 10:33 PM2016-05-20T22:33:18+5:302016-05-20T22:47:24+5:30

जिद्दीला चिकाटीची जोड : जितेंद्र सैतवडेकरच्या मत्स्य पदार्थांची आॅस्ट्रेलियापर्यंत भरारी

Believe it or not, success has been bowed down | हुलकावणी देणाऱ्या यशाने जिद्दीपुढे झुकवली मान

हुलकावणी देणाऱ्या यशाने जिद्दीपुढे झुकवली मान

Next

संकेत गोयथळे--गुहागर --कुठलाही व्यवसाय यशस्वीपणे चालवायचा म्हणजे व्यवसायातील आवडीबरोबरच त्याला जिद्द, चिकाटी व मेहनतीची जोड द्यावी लागते. कोकणी माणूस अनेकवेळा यामध्ये खडा उतरत नाही. मात्र, याला बगल देत अंजनवेल येथील जितेंद्र सीताराम सैतवडेकर या २८ वर्षीय तरुणाने दोनवेळा व्यवसायात मोठे नुकसान पत्करल्यानंतरही खचून न जाता शुभ्रा फुडस्द्वारे मच्छीच्या विविध रुचकर पदार्थ विक्रीचा व्यवसाय काही महिन्यातच यशस्वी करुन तरुणांसमोर एक आदर्श ठेवला आहे. जितेंद्रने १२ वी पर्यंतचे शिक्षण गुहागर येथे पूर्ण केले. त्यावेळी त्याच्या वडिलांना बोटीवर खलाशी म्हणून फक्त १८०० रुपये पगार होता. सामायिक घरात एक लहानशी खोली व दोन भाऊ, दोन बहिणी व आई - वडील असे सहाजणांचे कुटुंब दाटीवाटीने रहात होते. वडिलांचा पगार कमी असल्याने शिक्षण पूर्ण झाल्यानंतर लगेचच त्याने कंपनीमध्ये नोकरी स्वीकारली. नाकरी करत असतानाच सिएफएल बल्ब बनविण्याचे कामही सुरु केले. यामध्ये संबंधितांनी दीड लाखाला फसविले. पुढे कंपनीमधूनही ‘ब्रेक’ मिळाला. हाताला काही काम नाही म्हणून टाळकेश्वर मच्छीमार संस्थेच्या माध्यमातून कर्ज काढून बिगरयांत्रिकी डिपको (नौका) तीन वर्षे चालविली. यामध्ये मनुष्यबळाचा प्रश्न भेडसावू लागल्याने हा व्यवसायही त्याने बंद केला. या दरम्यान त्याचे लग्न झाले. वाढत्या संसाराचा खर्च भागवायचा कसा, हा मोठा पश्न त्याच्यापुढे होता.
यावेळी अंजनवेल येथे नव्याने सुरु झालेल्या बँक आॅफ इंडिया शाखेच्या व्यवस्थापकांशी त्याने संपर्क साधला. कर्ज प्रकरण करुन ‘युज अ‍ॅण्ड थ्रो’ पेन बनविण्याचा व्यवसाय सुरु केला. यामध्येही त्याला ५० हजारांचे नुकसान सोसावे लागले व हा व्यवसायही बंद करण्याची वेळ आली. अशावेळी काय करायचे हे सूचत नव्हते. तरीही त्याने जिद्द सोडली नाही. अंजनवेल येथील एका बचत गटामार्फत मच्छीपासून पॅकेटबंद टिकाऊ पदार्थ बनविले जातात. याला चांगली मागणीही होती. मात्र, काही कारणास्तव या बचत गटाला व्यवसाय बंद करावा लागणार होता. मात्र, जितेंद्र याने याच व्यवसायावर आपण लक्ष केंद्रीत केले तर नक्की यश येईल असा सकारात्मक विचार करत पुन्हा बँक आॅफ इंडियाकडून एक लाखाचे कर्ज घेतले. यावेळी बँक व्यवस्थापकांनी मार्केटींगमध्ये उतरण्याचा सल्ला दिला. अनुभव नव्हता पण जिद्द व मेहनत करण्याची तयारी होती. इंटरनेटवरुन माहिती घेतली असता, मच्छीपासून पदार्थ बनविण्याचे प्रशिक्षण रत्नागिरी येथील आगरनरळ मच्छीमार सोसायटीमार्फत दिले जाते. हे प्रशिक्षण मकरंद व श्रीकांत शालंदर यांनी त्याला दिले.
त्यानंतर त्याने शुभ्रा फुडस्ची सुरुवात करत प्रक्रिया करुन कोळंबी, शिंपले, कालवी लोणचं तसेच जवळा व बोेंबील चटणी बनविण्यास सुरु केली. काही महिन्यातच मोठ्या प्रमाणात आॅर्डर मिळू लागल्या. गोपाळगडावर येणारा पर्यटक तसेच धोपावे फेरीबोटीमध्ये स्टॉल लावून पर्यटकांना हे पदार्थ विक्री केले जातात. गुहागर शहर तसेच चौपाटीवरही शुभ्रा फुडस्चे पदार्थ उपलब्ध करुन त्याने व्यवसाय वाढवला. भविष्यात माशांपासून पापड बनविण्याचा त्याचा प्रयत्न असून, यासाठी तीन लाखापर्यंत गुंतवणूक खर्च अपेक्षित असल्याचे जितेंद्र सांगतो. या कामात जितेंद्रचे सर्व कुटुंबिय मदत करतात. तसेच यामुळे गावातील महिलांनाही त्याने रोजगार उपलब्ध करुन दिला आहे. बाजारपेठेसह आॅस्ट्रेलियालाही तो निर्यात करत असून, भविष्यात हा व्यवसाय मोठा करण्याचे स्वप्न असल्याचे जितेंद्र सांगतो.

Web Title: Believe it or not, success has been bowed down

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.