काेराेनाचा फायदा, शुभंकराेती पाठ अन् नमाजाचे पठण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:36 AM2021-09-23T04:36:29+5:302021-09-23T04:36:29+5:30

रत्नागिरी : कोरोनामुळे सध्या मुलांचे ऑनलाइन अध्ययन सुरू आहे. ऑनलाइन अध्ययनामुळे मुलांच्या हातात मोबाइल सहज उपलब्ध होत आहे. अध्ययनानंतरही ...

Benefits of Kareena, recitation of Shubhankaraeti and Annamaja! | काेराेनाचा फायदा, शुभंकराेती पाठ अन् नमाजाचे पठण!

काेराेनाचा फायदा, शुभंकराेती पाठ अन् नमाजाचे पठण!

Next

रत्नागिरी : कोरोनामुळे सध्या मुलांचे ऑनलाइन अध्ययन सुरू आहे. ऑनलाइन अध्ययनामुळे मुलांच्या हातात मोबाइल सहज उपलब्ध होत आहे. अध्ययनानंतरही मुले जास्त वेळ मोबाइलमध्ये गुंतत आहेत. कोरोनामुळे धार्मिक शिक्षण देणाऱ्या संस्थाही बंद आहेत; परंतु मुलांचे धार्मिक शिक्षण व्हावे, त्यांच्यावरील संस्कार घट्ट व्हावेत यासाठी पालकांची भूमिका आग्रही आहे. त्यामुळे कोरोना काळातही मुलांचे घरात धार्मिक शिक्षण सुरू आहे.

स्तोत्र पठणासह परवचासाठी काही पालक आग्रही आहेत. दररोज तिन्ही सांजेला पालक मुलांचे पाठांतर, अध्ययन करून घेत असल्याने मुलांचे धार्मिक शिक्षण सुलभ झाले आहे.

‘परवचा’मुळे पाठांतर

सहा वर्षांखालील मुलांचे उच्चार सुलभ व्हावेत यासाठी शुभंकरोती, विविध स्तोत्रांचे पाठांतर करून घेतले जाते. याशिवाय मराठीसह इंग्रजी महिने, आठवड्याचे वार, बाराखडी, पाढे पाठांतर घेतले जात आहे. एकूणच ‘परवचा’ दररोज म्हणून घेतली, तर पाठांतर सुलभ होऊन मुलांचे बाैद्धिकदृष्ट्या अध्ययनही सहज होत आहे.

उच्चार सुलभ

नमाज पठण असो, वा कुराण पठण करताना उच्चार सुलभ होणे आवश्यक आहे. शिवाय त्यासाठी पाठांतरही गरजेचे आहे. पाच वर्षांपासूनच्या मुलांना दिवसातून एखादा तास बसवून पाठांतर करून घेतले, तर अध्ययन सुलभ होते. कोरोनामुळे मुले घरी असल्याने धार्मिक शिक्षणासाठी मुलांना अवधी प्राप्त झाला आहे.

ताणतणावापासून संरक्षण

अभ्यासासाठी मोबाइल हातात आला असला तरी काही मुलांना मात्र मोबाइलचे जणू व्यसन लागले आहे. त्यामुळे पालक त्रस्त होत आहेत. विपश्यना सेंटरच्या माध्यमातून मुलांचे मनपरिवर्तन करण्यासाठी त्यांना ध्यान शिकविले जाते. मुलांची एकाग्रता वाढते, तणाव कमी होण्यास मदत होते, मुलांचे अभ्यासाकडे पुन्हा लक्ष केंद्रित होत आहे.

पाठांतर आवश्यक

अभ्यासाबरोबर धार्मिक शिक्षणही गरजेचे आहे. स्तोत्र पाठांतराबरोबर उच्चार महत्त्वाचे आहेत. ठरावीक वयात पाठांतराची सवय असेल, तर उच्चार सुलभ होतात. त्यामुळे सध्या मुलांना वेळ असल्याने दररोज ठरावीक वेळेत पाठांतर करून घेतले, तर नक्कीच मुलांचे धार्मिक शिक्षण सुलभ होईल.

-अमित घनवटकर, गणपतीपुळे

वेळेचा सदुपयोग

नमाज, कुराण पठणाची विशिष्ट पद्धत आहे. शिवाय त्यामध्ये उच्चारही महत्त्वाचे आहेत; परंतु ते सुलभ व्हावे यासाठी मुलांनी त्याचे अध्ययन करणे गरजेचे आहे. कोरोनामुळे मुले घरी असल्याने सध्या पालक या शिक्षणासाठी विशेष आग्रही असून, मुलांकडून आग्रहाने करून घेत आहेत.

-मुफ्ती ताैफिक सारंग, रत्नागिरी

एकाग्रता वाढते

मोबाइल किंवा अन्य व्यवधानामुळे मुलांवरील ताण वाढतो, अशावेळी मुलांचे मनपरिवर्तन गरजेचे आहे. कोकण विपश्यना केंद्राच्या माध्यमातून मुलांना ऑनलाइन ‘ध्यान’ शिकविण्यात येते. यामुळे मुलांचे मोबाइलचे वेड कमी होऊन मनाची एकाग्रता वाढते, अभ्यासाकडे मुले केंद्रित होत आहेत.

-संतोष आयरे, विश्वस्त, कोकण विपश्यना केंद्र

Web Title: Benefits of Kareena, recitation of Shubhankaraeti and Annamaja!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.