वाढदिवस रस्त्यावर साजरा कराल तर खबरदार...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:32 AM2021-09-19T04:32:52+5:302021-09-19T04:32:52+5:30
तन्मय दाते रत्नागिरी : सोशल मीडियाच्या जमान्यात काेणतीही घटना वेगाने सर्वत्र व्हायरल हाेते आणि त्याचा ट्रेंड बनतो. रात्री - ...
तन्मय दाते
रत्नागिरी : सोशल मीडियाच्या जमान्यात काेणतीही घटना वेगाने सर्वत्र व्हायरल हाेते आणि त्याचा ट्रेंड बनतो. रात्री - अपरात्री भररस्त्यात वाढदिवस साजरा करण्याचा ट्रेंड फोफावत आहे. माेठ्या शहरांमध्ये याचे प्रमाण जास्त असून, रस्त्यावर वाढदिवस साजरा करणाऱ्यांवर कायद्याचा बडगा उगारला जात आहे. मात्र, रत्नागिरीत असे प्रकार घडत नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असलेली तरूणाई यात अधिक तरबेज असते. तलवारीने केक कापायचा, मनोरंजन म्हणून हवेत गोळीबार करायचा, मध्यरात्री भररस्त्यावर डीजे लावायचा, गर्दी करून रस्ता पॅक करायचा व केेेक कापायचा, असे प्रकार माेठ्या शहरांमध्ये माेठ्या प्रमाणात घडत आहेत. मात्र, या प्रकारामुळे आजूबाजूच्या नागरिकांना त्रास सहन करावा लागताे. त्यामुळे पाेलिसांकडून आता अशा प्रकारांविराेधात कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. मागील तीन वर्षांत असे कोणतेही प्रकार रत्नागिरीत घडले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
...तर गुन्हा दाखल
रस्त्यावर वाहने उभी करून केेक कापणे.
डीजे लावून रस्त्यावर गोंधळ घालणे.
मध्यरात्री फटाक्यांची आतषबाजी करून ध्वनीप्रदूषण करणे.
पाचपेक्षा जास्त लोकांनी गर्दी करणे.
वाहतुकीला अडथळा निर्माण करणे.
आमची सर्वत्र बारीक नजर आहे
कोविडच्या निर्बंधांमुळे पोलीस सदैव कार्यरत असल्याने असे सार्वजनिक ठिकाणी गर्दी जमवून वाढदिवस साजरे करण्याचे प्रकार रत्नागिरीत गेल्या वर्षभरात तरी घडलेले नाहीत. पण असे प्रकार यापुढे घडू नयेत, यासाठी आमची सर्वत्र बारीक नजर असेल. कोणीही सार्वजनिक ठिकाणी कायद्याचा भंग होईल, असे कृत्य करू नये.
- डाॅ. मोहितकुमार गर्ग, जिल्हा पोलीस अधीक्षक, रत्नागिरी