चिपळूण तालुक्यातील 'डिके' दाम्पत्य लग्नाच्या वाढदिवसादिवशीच करणार देहदान संकल्प
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2022 01:41 PM2022-02-15T13:41:42+5:302022-02-15T13:42:02+5:30
त्यांच्यासह कुटुंबातील सर्व सदस्यांनी देहदान करण्याचा संकल्प केला आहे
असुर्डे : मृत्यूनंतर शरीर न जाळता वैद्यकीय महाविद्यालयाला दान केले, तर त्या शरीरातील काही अवयव जिवंत माणसाला उपयोगी पडतील, त्यातून त्याचे जीवन सार्थकी लागेल, हा विचार करून कुशिवडे (ता. चिपळूण) येथील भागाेजी बुधाजी डिके आणि गंगाबाई भागाेजी डिके यांनी देहदानाचा संकल्प केला आहे. लग्नाच्या वाढदिवसादिवशी म्हणजे १९ फेब्रुवारी राेजी याची कार्यवाही पार पडणार आहे.
चिपळूण तालुक्यामधील कुशिवडे गावातील रहिवासी भागोजी बुधाजी डिके आणि गंगाबाई भागोजी डिके यांचे लग्न दि. १९ फेब्रुवारी १९६२ रोजी झाले. त्यांच्या लग्नाला ६० वर्षे पूर्ण होऊन ६१ व्या वर्षात पदार्पण करत आहेत. या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यासह कुटुंबातील सर्व सदस्यांनी देहदान करण्याचा संकल्प केला आहे.
यामध्ये त्यांचे चिरंजीव विलास भागोजी डिके व विकास भागोजी डिके यांचे योगदान फार मोलाचे आहे. हा संकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी श्रमिक कृषी संवर्धन संस्था संचलित, विलास होडे स्मृती वाचनालय आरवली यांनी रविवार, दि. २० फेब्रुवारी, २०२२ रोजी सकाळी १०.३० वाजता कुशिवडे येथे भागोजी बुधाजी डिके यांच्या निवासस्थानी तो आयोजित केला आहे.
यावेळी ‘देहदान सर्वश्रेष्ठ दान’ या विषयावर युयुत्सु आर्ते मार्गदर्शन करणार आहेत. तसेच वालावलकर रुग्णालय डेरवणचे वैद्यकीय पथक व सावर्डे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. पूनम राणिम या उपस्थित राहणार आहेत. देहदानाबद्दल ज्या लोकांना माहिती घ्यायची असेल किंवा देहदान, अवयवदान व नेत्रदान करायचे असेल, तर त्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन श्रमिक कृषी संवर्धन संस्थेचे अध्यक्ष विलास होडे यांनी केले आहे.