भालावलमध्ये दीड एकरात फुलविली लिलीची फुलशेती

By admin | Published: April 17, 2016 10:07 PM2016-04-17T22:07:43+5:302016-04-17T23:57:55+5:30

शिक्षित तरूणांनी पारंपरिक शेतीचे जोखड झुगारून आधुनिक शेती करत व्यावसायिकदृष्ट्या नवा पायंडा पाडला आहे

Bhalavala floral lily fullsite | भालावलमध्ये दीड एकरात फुलविली लिलीची फुलशेती

भालावलमध्ये दीड एकरात फुलविली लिलीची फुलशेती

Next

महेश चव्हाण --ओटवणे --साजेसं उष्ण-दमट हवामान, खडकाळ जमीन, वन्यप्राण्यांपासून सुरक्षित, मुबलक पाणी व किफायतशीर व्यवसाय या सर्व बाबींचा समतोल लक्षात घेत सावंतवाडी तालुक्यातील भालावल येथील अशोक धाकू परब यांनी तब्बल दीड एकरात ‘लिली’ शेती यशस्वीरित्या फुलविली आहे.याअगोदर फक्त घाटमाथ्यावरील शेतकऱ्यांच्या नवनवीन शेती प्रयोगाच्या आख्यायिका ऐकू यायच्या. शेतीतील बदलते तंत्रज्ञान स्वीकारत व आधुनिक शेतीद्वारे तेथील शेतकऱ्यांनी सधनता प्राप्त केली होती. त्यामुळे शेती करायची ती घाटमाथ्यावरच्यांनीच, असे बोलले जायचे. त्यामुळे योग्य मार्गदर्शन, पैसा आणि अनुभव याअभावी तळकोकणात शेतीविषयी बरीच अनास्था होती. मात्र, चालू दशकात ही अनास्था मोडीत निघाली आहे. आधुनिकतेमुळे शेतीला आज व्यवसायाचे स्वरुप आले आहे. शिक्षित तरूणांनी पारंपरिक शेतीचे जोखड झुगारून आधुनिक शेती करत व्यावसायिकदृष्ट्या नवा पायंडा पाडला आहे. त्याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे भालावल येथील शेतकरी अशोक धाकू परब.
वडिलोपार्जित माड-पोफळीच्या बागा, काजू कलमे आणि काही प्रमाणात भातशेती अशा परंपरागत शेतीबरोबर नाविन्यपूर्ण आधुनिक शेती करण्याचा मानस अशोक परब यांचा होता. जमीन खडकाळ असल्याने रोपे जगण्याची शाश्वती नसताना आणि त्यापेक्षाही कठीण मेहनत या दोहोंचा समन्वय साधण्यात त्यांना यश आले. वन्यप्राण्यांपासून सुरक्षिततेची हमी देणारी आणि कमी कालावधीत उत्पन्न देणारी ‘लिली’ फु लशेती त्यांनी निवडली.त्यासाठी त्यांनी थेट पुण्याहून लिलीची पाच हजार रोपे मागवली. दोन रोपांमध्ये किमान अडीच फूट अंतर राहील, अशा पध्दतीने दीड एकर जमिनीमध्ये पाच हजार रोपांची लागवड केली. फूटभर खड्ड्यात माती-शेणखत याचा वापर करून तो खड्डा भरावा लागतो. या पिकाला पाणीही जास्त लागते. पण सिंचन पध्दतीने नियोजन केल्यास पाणी कमी लागते. लिलीच्या रोपाची लागवड केल्यानंतर महिन्यातून एकदा अर्धा किलो शेणखत तसेच १५ दिवसांनी युरिया, गुळी खताचा थोडाफार मारा करावा लागतो. रोपट्याची झपाट्याने वाढ होण्यासाठी त्याच्या मुळाकडील भाग स्वच्छ असावा लागतो. थेट सूर्यप्रकाशाची म्हणजे उष्ण हवामानाची या पिकाला गरज असल्याने सावलीत ही झाडे खुरटतात.
लागवडीनंतर तब्बल सहा महिन्यांनी अडीच फुटापर्यंत रोपटे उंची घेत उत्पादन द्यायला सुरूवात करते. एका झाडाला दरदिवशी १० ते १२ फुले येतात. १ किलो मागे ६० ते १०० रूपये असा हमीभाव या फुलांना मिळतो. स्थानिक बाजारपेठेत ६०, तर गोवा राज्यात या फुलांना किलोमागे १०० ते १२० रूपये हमीभाव ठरलेला आहे. सणासुदीच्या काळात या फुलाचे भाव गगनाला भिडतात. स्थानिक बाजारपेठेतच १०० रूपयांहून अधिक, तर मोठ्या शहरांमध्ये १५० ते २०० रूपयांपर्यंत भाव जातो.या शेतीमधून दिवसाला १२ ते १४ किलो एवढी फुले मिळतात. म्हणजे दिवसाकाठी सरासरी १ हजार रूपये धरल्यास वर्षाकाठी तब्बल ३ लाखाची उलाढाल लिली फुलशेतीमार्फत करता येते, असे परब यांनी सांगितले.

लागवड एकदाच, उत्पादन कायमचे
लिलीची शेती ही किफायतशीर शेती म्हणून ओळखली जाते. सुरूवातीला लागवडीसाठी अधिक खर्च येतो. त्यानंतर फक्त साफसफाई, देखरेख आणि खतांचा समप्रमाणात मारा करावा लागतो. कारण हे पीक तब्बल आठ वर्षे उत्पादन देते. त्यामुळे पहिल्या वर्षीच्या तुलनेत खर्च कमी आणि उत्पादन अधिक मिळते. वडिलोपार्जित शेतीची परंपरा असलेल्या अशोक परब यांनी नूतन लिली फु लशेती करताना अथक मेहनत घेतली आहे. त्यासाठी त्यांना पत्नी अश्विनी परब, मुलगा राहुल, साईल व मुलगी राधिका यांचे मोलाचे सहकार्य लाभते.


शिक्षणक्षेत्रात स्पर्धा वाढल्याने अनेक सुशिक्षित, पदवीधर युवक बेरोजगार आहेत. ग्रामीण भागातील युवकांनी नोकरीच्या मागे न धावता शेतीचे प्रगत तंत्रज्ञान व आधुनिकता लक्षात घेऊन शेती केल्यास नोकरीच्या दहापट अधिक उत्पन्न युवक शेतीतून मिळवू शकतात.
- अशोक परब
लिली फुलशेती बागायतदार

Web Title: Bhalavala floral lily fullsite

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.