ट्रेडिंगच्या नावाने फसवणूक करणाऱ्या भामट्याला गुजरातमधून अटक, एक कोटी पेक्षा जास्त फसवणूक केल्याचे उघड
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2024 01:04 PM2024-08-19T13:04:28+5:302024-08-19T13:04:48+5:30
दिल्ली, बंगळुरू, महाराष्ट्रातही गुन्हे दाखल
रत्नागिरी : बनावट ट्रेडिंग ॲप्लिकेशन व क्रिप्टाे करन्सीद्वारे जास्त परताव्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या भामट्याला खेड पाेलिसांनी गुजरातमधून रविवारी सायंकाळी अटक केली आहे. नारायानलाल शंकरलाल जाेशी (४२, रा. भावना पार्क, गाेडदरा, सुरत-गुजरात, सध्या रा. प्लास्मा, उदयपूर, राजस्थान) असे त्याचे नाव आहे. यापूर्वी याप्रकरणी चंडीगड येथून एकाला अटक केलेली आहे.
याप्रकरणी खेड पाेलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला हाेता. फिर्यादीची १९ एप्रिल २०२४ ते २५ मे २०२४ या कालावधीत एपीके लर्निंग ग्रुपवरील ट्रेडिंगबाबतच्या गाेष्टी व माेबाइलवर पाठविलेले मेसेजद्वारे पैसे गुंतविण्यास सांगितले हाेते. पैसे गुंतवून जास्तीत जास्त रकमेचा परतावा देण्याचे आमिष दिले हाेते. त्यानंतर फिर्यादीची तब्बल २४ लाख ८५ हजारांची फसवणूक केली हाेती. या रकमेपैकी दहा लाख रुपये नारायानलाल जाेशी याच्या बँकेत जमा झाल्याचे तपासात पुढे आले हाेते. त्याआधारे त्याचा उदयपूर-राजस्थान व सुरत-गुजरात येथे शाेध घेण्यात आला. मात्र, ताे पाेलिसांना गुंगारा देत हाेता.
त्यानंतर पाेलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, ताे सुरत येथील भावना पार्क येथे बँक खाते, चेकबुक, एटीएम व बँकेशी संलग्न असणारे सिमकार्ड घेण्यासाठी येणार असल्याचे कळले. त्यानंतर पाेलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. त्याच्याकडून माेबाइल व सिमकार्ड, बँक पासबुक, चेकबुक ताब्यात घेतले आहे. ही कारवाई खेड पाेलिस स्थानकाचे पाेलिस निरीक्षक नितीन भाेयर, पाेलिस उपनिरीक्षक श्रीकृष्ण येवले, हेड काॅन्स्टेबल दीपक गाेरे, रमिज शेख, पाेलिस काॅन्स्टेबल राम नागुलकवार, वैभव ओहाेळ, नीलेश शेलार, सायबर पाेलिस स्थानकाचे काॅन्स्टेबल साैरभ कदम यांनी केली.
एक काेटीपेक्षा जास्त फसवणूक
या प्रकरणात स्वत:चे व इतरांचे बँक खाते वापरून क्रिप्टाे करन्सीमध्ये गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवून लाेकांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याने आतापर्यंत सुमारे एक काेटी रुपयांपेक्षा जास्त फसवणूक केल्याचे उघड झाले आहे.
दिल्ली, बंगळुरू, महाराष्ट्रातही गुन्हे दाखल
नारायानलाल जाेशी याच्यावर दिल्ली, बंगळुरू, महाराष्ट्र या ठिकाणी गुन्हे दाखल असल्याचे पाेलिस तपासात पुढे आले आहे. ताे काेणत्याही खाेटा व्यापार असल्याचे दाखवून बँकेत खाते उघडत हाेता. बँक खात्यास प्राप्त हाेणारे अनटायटल ट्रान्झॅक्शन अप टू ५ लाख या सेवेद्वारे लाखाेंची फसवणूक करत हाेता.