भास्कर जाधव आता चिपळुणातून लढण्यास इच्छुक; रत्नागिरी, चिपळूण मतदारसंघातील उद्धवसेनेच्या इच्छुकांच्या मुलाखती

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2024 12:21 PM2024-08-17T12:21:43+5:302024-08-17T12:23:28+5:30

रत्नागिरी : विधानसभेची आगामी निवडणूक डाेळ्यासमाेर ठेवून उद्धवसेनेने आतापासूनच उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. पक्षाचे सचिव आणि काेकण निरीक्षक ...

Bhaskar Jadhav is willing to contest from Chiplun constituency for the upcoming assembly elections | भास्कर जाधव आता चिपळुणातून लढण्यास इच्छुक; रत्नागिरी, चिपळूण मतदारसंघातील उद्धवसेनेच्या इच्छुकांच्या मुलाखती

भास्कर जाधव आता चिपळुणातून लढण्यास इच्छुक; रत्नागिरी, चिपळूण मतदारसंघातील उद्धवसेनेच्या इच्छुकांच्या मुलाखती

रत्नागिरी : विधानसभेची आगामी निवडणूक डाेळ्यासमाेर ठेवून उद्धवसेनेने आतापासूनच उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. पक्षाचे सचिव आणि काेकण निरीक्षक मिलिंद नार्वेकर यांनी रत्नागिरी, चिपळूण मतदारसंघातील इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या असून, गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी चिपळूणमधून इच्छुक असल्याचे सांगितले आहे. त्याचबराेबर या मतदारसंघातून राेहन बने आणि राजेंद्र महाडिक हेही इच्छुक आहेत. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून उदय बने, प्रदीप उर्फ बंड्या साळवी आणि राजेंद्र महाडिक हे इच्छुक आहेत.

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून मिलिंद नार्वेकर यांनी रत्नागिरीचा दाैरा केला. या दाैऱ्यात त्यांनी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात पक्षाची राजकीय स्थिती काय आहे. त्याचबराेबर प्रत्येक तालुक्यात प्रबळ विराेधक काेण आहेत? पक्षासमाेरील अडचणी काय आहेत, याची माहितीही त्यांनी जाणून घेतली. तसेच आगामी विधानसभेसाठी पक्षामध्ये इच्छुक कोण आहे, याची चाचपणी केली. रत्नागिरी व चिपळूण मतदारसंघात इच्छुकांची संख्या अधिक आहे.

रत्नागिरी विधानसभा मतदारसंघामध्ये जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष उदय बने, रत्नागिरीचे माजी नगराध्यक्ष प्रदीप उर्फ बंड्या साळवी, माजी जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक हे तिघे इच्छुक आहेत. नार्वेकर यांनी तिघांच्याही मुलाखती घेतल्या. चिपळूण मतदारसंघातून आमदार भास्कर जाधव, जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष रोहन बने आणि राजेंद्र महाडिक इच्छुक आहेत. इच्छुकांच्या मुलाखती घेऊन त्याचा अहवाल उद्धव ठाकरे यांना देणार आहे.

गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी चिपळूण विधानसभा मतदारसंघातून इच्छुक असल्याचे सांगितल्याने साऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. गेल्या काही महिन्यांपासून त्यांनी चिपळूणमधील विषय हाताळून चिपळूणकडे लक्ष केंद्रित केले हाेते. पक्षाने संधी दिल्यास आपण चिपळूणमधूनही लढू, असे सुताेवाच त्यांनी यापूर्वी केले हाेते. आता तर त्यांनी मुलाखत दिल्याने त्यांनी चिपळुणातून लढण्याची तयारी केल्याचे पुढे आले आहे.

तगडा उमेदवार शाेधा

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मिलिंद नार्वेकर यांच्यावर काेकणची जबाबदारी साेपवली आहे. विशेषत: रत्नागिरी विधानसभा मतदारसंघावर त्यांनी विशेष लक्ष केंद्रित केले आहे. या मतदारसंघातून काेणाला उमेदवारी मिळणार हे गुलदस्त्यातच आहे. पक्षातीलच काेणाला उमेदवारी मिळणार की, इतर पक्षातून उमेदवार आयात करणार हेच पाहायचे आहे. मात्र, या मतदारसंघातून तगडा उमेदवार शाेधा, असे आदेश मिलिंद नार्वेकर यांना देण्यात आले आहेत.

मुलासाठी गुहागर साेडणार?

आमदार भास्कर जाधव यांनी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विक्रांत जाधव यांच्यासाठी माेर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यांच्यासाठी गुहागर मतदारसंघ साेडण्याची तयारी भास्कर जाधव यांनी केली आहे. त्यामुळेच त्यांनी चिपळूणमधून लढण्याची तयारी केली आहे. या मतदारसंघातून इच्छुक म्हणून मुलाखतही दिली आहे.

राजापूरबाबत काेणती मात्रा?

राजापूर विधानसभा मतदारसंघावर महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाने दावा केला आहे. या मतदारसंघात उद्धवसेनेचे राजन साळवी हे विद्यमान आमदार आहेत. या मतदारसंघातील काही पदाधिकाऱ्यांशी मिलिंद नार्वेकर यांनी चर्चाही केली आहे. मात्र, काँग्रेसने जागेवर दावा केल्याने नार्वेकर काेणती भूमिका घेणार, हे महत्त्वाचे ठरणार आहे. विद्यमान आमदार म्हणून पक्षाकडेच जागा ठेवली जाणार की, काँग्रेसला जागा साेडणार, हे लवकरच कळेल.

Web Title: Bhaskar Jadhav is willing to contest from Chiplun constituency for the upcoming assembly elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.