भास्कर जाधव यांचा बाजार उठवणार, नीलेश राणेंचे भर सभेत टीकास्त्र
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2024 01:31 PM2024-02-17T13:31:56+5:302024-02-17T13:34:03+5:30
दगडाला उत्तर कशाने देऊ ते बघाच
गुहागर : नारायण राणे माझं दैवत आहे, राणेंसाठीच मी जिवंत आहे. भास्कर जाधव तुम्ही राणे कुटुंबीयांच्या विरोधात वैर घेतले आहे, जेवढा कुडाळ मतदार संघात खर्च करणार तेवढाच गुहागर विधानसभा मतदारसंघातही खर्च करणार व तुम्हाला घरी पाठवणार, नीलेश राणेच तुमचा बाजार उठवणार, अशा शब्दात माजी खासदार नीलेश राणे यांनी शृंगारतळी (ता. गुहागर) येथील सभेत आमदार भास्कर जाधव यांच्यावर टीका केली.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सिंधुदुर्ग दौऱ्यात आमदार भास्कर जाधव यांनी राणे कुटुंबावर टीका केली होती. त्याला उत्तर देण्यासाठी शुक्रवारी गुहागर मतदारसंघातील शृंगारतळी येथे नीलेश राणे यांच्या सभेचे आयाेजन केले हाेते. या सभेत नीलेश राणे यांनी भास्कर जाधव यांच्या टीकेचा समाचार घेतला.
नीलेश राणे म्हणाले की, नातू कुटुंबीयांनी हा मतदारसंघ वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवण्याचे काम केले. मात्र, भास्कर जाधव यांनी या मतदारसंघाची वाट लावली. या मतदारसंघाला अजून किती लुटणार आहात? पाच टक्के दिल्याशिवाय येथील कुठलेही कंत्राटी काम सुरू होत नाही, असा आराेप राणे यांनी केला. ते पुढे म्हणाले की, राणे कुटुंबीय कधीच स्वतःहून काेणाच्या वाकड्यात जात नाहीत आणि जर काेणी आमच्या वाकड्यात गेला तर त्याला सोडत नाहीत, असा इशाराही दिला. भास्कर जाधव यांची चिपळूणची भाईगिरी याच राणेंनी संपवली होती, असेही ते म्हणाले.
राणे पुढे म्हणाले की, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना यांना साधे राज्यमंत्रिपदही दिले नाही, अशी यांची परिस्थिती आहे. भास्कर जाधव यांच्यामुळे मला आज तोंड खराब करावे लागले असे सांगून दी एंड पण नीलेश राणेच करणार, असा इशाराही त्यांनी शेवटी दिला.
यावेळी माजी आमदार डॉ. विनय नातू, संदीप कुरूतडकर, चिपळूणच्या माजी नगराध्यक्षा सुरेखा खेराडे, केदार साठे, प्रशांत शिरगावकर, परिमल भोसले, तालुकाध्यक्ष नीलेश सुर्वे यांनीही भास्कर जाधव यांच्यावर जोरदार टीका करत निषेध केला.
दगडाला उत्तर कशाने देऊ ते बघाच
गुहागर येथील सभेसाठी येत असताना चिपळूण येथे आमदार भास्कर जाधव यांच्या कार्यालयासमोर नीलेश राणे यांच्या गाडीच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आली. याला उत्तर देताना दगडांच्या बदल्यात तुम्हाला काय देईन ते पुढे बघा, असा इशारा राणे यांनी दिला. यापुढे कुठेही राणे कुटुंबाविराेधात तोंड उघडले तर तेथे जाऊन अशाच प्रकारे सभा घेऊन त्याचा समाचार घेणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.