भातगाव ग्रामस्थांची तहसीलदार कार्यालयावर धडक
By admin | Published: March 16, 2015 11:16 PM2015-03-16T23:16:08+5:302015-03-17T00:10:59+5:30
पाणी अडवल्याची तक्रार : सामोपचाराने तोडगा काढण्याचा ग्रामस्थांच्या बैठकीत निर्णय
गुहागर : भातगाव धक्का येथे पुरुषोत्तम गणेश करमरकर यांनी आपल्या मालकीच्या जागेतून जाणाऱ्या नैसर्गिक झऱ्याचे पाणी अडवल्याप्रकरणी येथील महिला व ग्रामस्थांनी तहसीलदार व पोलीस निरीक्षकांकडे धाव घेऊन आपल्या व्यथा मांडल्या. २० मार्चला याबाबत एकत्र चर्चा करुन सामोपचाराने तोडगा काढला जाणार आहे.भातगाव धक्का येथे ६५ घरांची वस्ती आहे. पिण्याचे पाण्याची टंचाई असल्याने वाडी बाहेरुन जंगलभागातून नैसर्गिक स्रोताचे पाण्यावर अवलंबून राहवे लागते. हे पाणी पुरुषोत्तम गणेश करमरकर नामक ग्रामस्थांच्या मालकीच्या जागेतून येत असल्याने करमरकर यांचेकडून या डोहामध्ये बांधकाम करुन पाणी अडवले होते. याबाबत प्रथम तहसीलदारांना निवेदन दिल्यानंतर हे बांधकाम तोडण्याचे आदेश दिले होते. यावेळी तलाठी व ग्रामसेवक यांच्या उपस्थितीत डोहामध्ये पाईप टाकून जनावरांसाठी पिण्याचे पाण्याची सोय करण्यात आली होती, काही दिवसांनी हे पाईप उडवून टाकल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. त्यामुळे ग्रामस्थांची गैरसोय होत असून, या प्रकारांविरूध्द आता ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. करमरकर व ग्रामस्थांमध्ये हा वाद वाढण्याची शक्यता असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
याबाबत तहसीलदार वैशाली पाटभल, पोलीस निरीक्षक विनित चौघरी, सभापती राजेश बेंडल, पंचायत समिती कक्ष अधिकारी दत्ताराम आंबी, ग्रामीण पाणी पुरवठ्याचे जी. व्ही. गायकवाड आदींच्या उपस्थितीत चर्चा झाल्यानंतर २० मार्चला एकत्रित चर्चा करुन तोडगा काढण्याचे ठरले. दरम्यान हा विषय आता गावपातळीवर गाजण्याची शक्यता निर्माण झाले आहे.
यावेळी महिला वंदना पाष्टे, इंदिरा मोरे, सुरेखा मोरे, वैशाली सोलकर, उज्वला डिंगणकर, रोहिणी गाडेकर उपस्थित होते. (प्रतिनिधी)