भाईंदरच्या बेपत्ता सोने व्यावसायिकाचा रत्नागिरीत खून, तिघांना बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2022 04:48 PM2022-09-23T16:48:35+5:302022-09-23T16:49:21+5:30
आर्थिक व्यवहारातून रत्नागिरीतील सुवर्णकार भूषण खेडेकर याने आपल्या दोन मित्रांच्या साहाय्याने हा खून केले असल्याचे तपासात पुढे आले
रत्नागिरी : रत्नागिरीत बेपत्ता झालेल्या ठाण्यातील सोने व्यावसायिक कीर्तीकुमार अजयराज कोठारी यांचा मृतदेह सापडला आणि त्याचा गळा आवळून खून झाला असल्याचे स्पष्ट झाले. आर्थिक व्यवहारातून रत्नागिरीतील सुवर्णकार भूषण खेडेकर याने आपल्या दोन मित्रांच्या साहाय्याने हा खून केले असल्याचे तपासात पुढे आले आणि पोलिसांनी भूषण खेडेकर व अन्य दोघांना बेड्या ठोकल्या. भूषणने हत्या केल्याची कबुली पोलिसांना देत आपणच मध्यरात्री कोठारी यांचा मृतदेह आबलोलीनजीकच्या नदीत फेकल्याचे पोलिसांना सांगितले आहे.
अटक केलेल्या तिघांना गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना ७ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. मृतदेह घेऊन जाण्यासाठी वापरलेली रिक्षाही पोलिसांनी जप्त केली आहे. एका व्यापाऱ्यानेच व्यापाऱ्याचा खून केल्याने बाजारपेठेत खळबळ उडाली आहे. या प्रकरणात भूषण सुभाष खेडेकर (४२ रा. खालची आळी), महेश मंगलप्रसाद चौगुले (३९, रा. मांडवी, रिक्षाचालक), फरीद महामुद होडेकर (३६, रा. भाट्ये , खोतवाडी) यांना अटक करण्यात आली आहे.
सोने विक्रीसाठी रत्नागिरी बाजारपेठेत आलेले ठाणे भाईंदर येथील सोने व्यापारी कीर्तीकुमार कोठारी सोमवारी बेपत्ता झाले. मंगळवारी त्यांच्याशी संपर्क होत नसल्याने त्यांचा मुलगा करण बुधवारी रत्नागिरीत दाखल झाला. त्याने आपले वडील बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. पोलिसांनी संशयित म्हणून तिघांना ताब्यात घेतले आणि या प्रकरणाचा वेगाने उलगडा झाला.
दुकानात गेले; पण बाहेर नाही आले
बेपत्ता कीर्तीकुमार यांचा शोध घेताना पोलिसांनी बाजारपेठेतील सीसीटीव्ही फुटेज तपासले होते. त्यावेळी कीर्तीकुमार त्रिमूर्ती ज्वेलर्समध्ये आत गेलेले दिसले. मात्र ते दुकान बंद होईपर्यंत दुकानातून बाहेरच आले नसल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे पोलिसांनी दुकानमालक भूषण खेडेकर यांची चौकशी केल्यानंतर त्याने दोन मित्रांच्या मदतीने हा खून केल्याचे आणि मृतदेह आबलोली येथे टाकल्याचे कबूल केले.