रत्नागिरीतील मजगावमधील भोंदूबाबाला एक वर्ष कारावास, घर शुद्धीकरणाच्या नावाखाली केले होते दागिने लंपास
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2023 06:48 PM2023-03-21T18:48:36+5:302023-03-21T18:49:03+5:30
हा प्रकार २८ एप्रिल ते १० ऑक्टाेबर २०१६ या कालावधीत घडला हाेता
रत्नागिरी : घरातील माणसे वारंवार आजारी पडतात. औषधोपचार करूनही काहीही उपयोग होत नाही. त्यामुळे तुम्हाला घराचे शुद्धीकरण करावे लागेल, असे सांगून जादूटोणा करून घरातील महिलांचे सुमारे दीड लाख रुपयांचे दागिने घेऊन फसवणूक केल्याचा प्रकार घडला हाेता. हा प्रकार २८ एप्रिल ते १० ऑक्टाेबर २०१६ या कालावधीत घडला हाेता. याप्रकरणी भोंदूबाबा मुश्ताक इसा काझी (५२, रा. मजगाव, रत्नागिरी) याला येथील न्यायालयाने १ वर्ष कारावास व १ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.
रत्नागिरी तालुक्यातील भावेआडम येथे राहणारे विलास शंकर तांबे (५२) यांनी फिर्याद दिली हाेती. घरातील काही व्यक्ती सातत्याने आजारी पडत होत्या. औषधोपचार केल्यानंतरही त्यांना अपेक्षित गुण येत नव्हता. याच संधीचा फायदा मजगाव येथील भोंदूबाबा मुश्ताक काझी याने उठवला होता. घरातील माहिती घेतल्यानंतर तुम्हाला घराचे शुद्धीकरण करावे लागेल, असे तांबे यांना सांगितले होते. त्यानुसार त्याने घरात येऊन घरातील महिलांचे वापरातील दागिन्यांचेही शुद्धीकरण करावे लागेल, असे सांगितले.
सुमारे दीड लाख रुपये किमतीची ४ मंगळसूत्रे, ४ चेन, २ कानातील कुड्या, साखळी व रोख १ हजार ५०० रुपये घेऊन ताे गेला हाेता. हे दागिने दि. १८ जुलै २०१७ पर्यंत त्याने परत न दिल्याने अखेर विलास तांबे यांनी ग्रामीण पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार गुन्हा दाखल करून ९ ऑगस्ट २०१७ राेजी मुश्ताक काझी याला अटक करण्यात आली होती.
या खटल्याची सुनावणी शनिवारी (१७ मार्च) पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने आरोपी मुश्ताक काझी याला भादंवि कलम ४२० अन्वये १ वर्ष साधा कारावास व ५०० रुपये दंड, दंड न भरल्यास ४ दिवस साधा कारावास, जादूटोणा अधिनियम २०१३ चे कलम ३ अन्वये १ वर्ष साधा कारावास व ५०० रुपये दंड, दंड न भरल्यास ४ दिवस साधा कारावास अशी शिक्षा ठोठावली.
ग्रामीण पोलिसचे निरीक्षक मारुती जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पाेलिस हेडकाॅन्स्टेबल एस. एल. पेंढामकर यांनी गुन्ह्याचा तपास केला होता. पैरवी अधिकारी सहायक पाेलिस निरीक्षक डी. बी. सूर्य, सहायक पोलिस उपनिरिक्षक अनंत जाधव, पोलिस हवालदार संजीवनी मोरे यांनी काम पाहिले.