Ratnagiri: बक्कळ पैसे कमावण्यासाठी ‘ताे’ भिक्षुकीतून वळला भोंदूगिरीकडे; अखेर पोलिसांच्या सापळ्यात अडकला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2024 12:11 PM2024-06-27T12:11:19+5:302024-06-27T12:15:42+5:30

यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल, लाेकांना लुबाडून ऐशाेआरामाचे जीवन

bhondubaba Ganesh Waikar and Ashok Joshi arrested in Chiplun city | Ratnagiri: बक्कळ पैसे कमावण्यासाठी ‘ताे’ भिक्षुकीतून वळला भोंदूगिरीकडे; अखेर पोलिसांच्या सापळ्यात अडकला

Ratnagiri: बक्कळ पैसे कमावण्यासाठी ‘ताे’ भिक्षुकीतून वळला भोंदूगिरीकडे; अखेर पोलिसांच्या सापळ्यात अडकला

चिपळूण : संपूर्ण कुटुंब भिक्षुकीत, तसा गणेश वायकर हाही भिक्षुकी करत हाेता. त्यातून ओळख निर्माण झाली आणि बक्कळ पैसा कमावण्याच्या नादात चक्क तो भोंदूगिरीकडे वळला. गेले वर्षभर तो चिपळूणमध्ये आपले बस्तान बांधून होता. मात्र, मंगळवारी अखेर त्याचा खेळ खल्लास झाला आणि अलगद पोलिसांच्या सापळ्यात अडकला.

चिपळूण शहरातील मार्कंडी येथे एका आलिशान सदनिकेत गणेश वायकर व त्याचा साथीदार अशोक जोशी हे गेले वर्षभर राहत होते. भोंदूगिरीच्या नावाखाली त्याने अनेक भक्तांना जोडले होते. चिपळूणमधील दोन महिला त्याच्याकडे गेल्या आणि आपल्याला फार त्रास आहे तसेच उद्योगधंद्यात यश येत नाही, असे कथन करताच भोंदूबाबाने नेहमीप्रमाणे वाक्यरचना सुरू केली.

आपल्यावर मोठी करणी केलेली आहे, सर्व काही व्यवस्थित करून देतो, असे आश्वासन देत तब्बल दीड लाख रुपयांची मागणी केली. सर्व माहिती घेतल्यानंतर दोन्ही महिला थेट चिपळूण पोलिस स्थानकात पोहोचल्या आणि पोलिस निरीक्षक रवींद्र शिंदे यांच्याकडे सर्व प्रकार कथन केला. खात्री करण्यासाठी शिंदे यांच्या समोरून फोन केला तेव्हा सर्व प्रकार पोलिसांच्या लक्षात आला.

पोलिस निरीक्षक रवींद्र शिंदे स्वतः मोहिमेवर निघाले आणि त्या सदनिकेवर पोहाेचून भोंदूगिरी करणाऱ्या गणेश वायकर व अशोक जोशी या दोघांना रंगेहाथ पकडले. त्यानंतर मात्र पोलिसांनी तातडीने पुढील कारवाई सुरू केली. कोकणात आपल्या व्यवसायाला भरपूर वाव आहे. याची पूर्ण माहिती घेत त्याने चिपळूणमध्ये बस्तान बसवले आणि बक्कळ पैसा उकळत होता. त्याच्यावर यापूर्वीही गुन्हे दाखल असून, ते गुन्हे कसले आणि कुठे दाखल आहेत, याचा तपास पोलिस घेत आहेत.

वार ठरलेले

चिपळूणमध्ये ज्या सदनिकेत तो राहत होता, ती सदनिका त्याने भाडेतत्त्वावर घेतलेली आहे. वर्षभरापासून तो येथे राहत असून, अनेक ठिकाणी तो भेटही देत होता. त्याचे वारदेखील ठरलेले होते, अशी माहिती समोर येत आहे.

विशेष ‘टॅगलाईन’

‘करणी, जादूटोणा, भुताटकीचा खात्रीशीर इलाज’ अशी त्याची ‘टॅगलाईन’ राहिली होती. लिंबू, अबीर, गुलाल समोर ठेवून येणाऱ्याला व्यवस्थित संमोहित करण्याची चलाखी त्याला अवगत हाेती. यातून बक्कळ पैसा कमावून तो ऐशाेआरामचे आयुष्य जगत होता.

Web Title: bhondubaba Ganesh Waikar and Ashok Joshi arrested in Chiplun city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.