रत्नागिरी जिल्ह्यातील तीन बंदरे अत्याधुनिक बनविणार : पालकमंत्री उदय सामंत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2024 12:09 PM2024-10-09T12:09:49+5:302024-10-09T12:10:59+5:30

राजापुरातील साखरीनाटे बंदराचे भूमिपूजन

Bhoomipujan of Sakhrinate port in Rajapur taluka by Minister Uday Samant | रत्नागिरी जिल्ह्यातील तीन बंदरे अत्याधुनिक बनविणार : पालकमंत्री उदय सामंत

रत्नागिरी जिल्ह्यातील तीन बंदरे अत्याधुनिक बनविणार : पालकमंत्री उदय सामंत

राजापूर : साखरीनाटे, मिरकरवाडा, हर्णे ही तीनही बंदरे जिल्ह्यातील मच्छीमारांना ताकद देणारी आहेत. या बंदरांचा विकास करून कर्नाटक राज्यामधील मल्पी बंदरापेक्षाही अत्याधुनिक बनविणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे उद्याेगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.

राजापूर तालुक्यातील साखरीनाटे बंदराचे भूमिपूजन मंत्री सामंत यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आले. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाला सिंधुरत्न योजनेचे निमंत्रित सदस्य किरण सामंत, सरपंच गुलजार ठाकूर, सरपंच संदीप बानकर, प्रादेशिक बंदर अधिकारी कॅ. संदीप भुजबळ, मेरीटाईम बोर्डचे कार्यकारी अभियंता मनीष मेतकर, तहसीलदार विकास गंबरे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

मंत्री सामंत पुढे म्हणाले की, राजापुरातील साखरीनाटे, रत्नागिरीतील मिरकरवाडा बंदर, दापाेलीतील हर्णे बंदर ही तीन बंदरे जिल्ह्यातील मच्छीमारांना ताकद देणारी बंदरे आहेत. हर्णे बंदराच्या विकासासाठी २०० कोटी याआधी मंजूर करण्यात आले आहेत. आता साखरीनाटे बंदरासाठी १५३ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. तसेच मिरकरवाडा बंदराच्या विकासासाठी दुसऱ्या टप्प्यात शंभर कोटी रुपये देण्यात येतील. पुढच्या आराखड्यामध्ये येथील जोड रस्त्यासाठी निधी मंजूर केला जाईल. मच्छीमार महिलांना मच्छी सुकवण्यासाठी दोन्ही ओटे त्यांच्या मागणीनुसार मंजूर केल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले.

मंत्री सामंत म्हणाले की, विकासकामे करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. गडकिल्ले संवर्धनासाठी ३ कोटी, रस्त्यांसाठी ४ कोटी, मुख्यमंत्री सडक योजनेतून ५० किलोमीटरचे रस्ते राजापुरात मंजूर केले आहेत. राजापूर तालुक्यातील धरणाला पैसे देण्याचा आणि जामदा धरण डागडुजीचा निर्णयही घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

डिझेल काेटाबाबत निर्णय घेऊ

मच्छीमारांच्या डिझेल कोटा बंदसंदर्भात आपण स्वत: सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेऊन चर्चा करेन. याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असा शब्दही मंत्री सामंत यांनी दिला.

Web Title: Bhoomipujan of Sakhrinate port in Rajapur taluka by Minister Uday Samant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.