अटलजींच्या हस्ते कोकण रेल्वेचे राष्ट्रार्पण हे कोकणासाठी भूषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2018 11:09 PM2018-08-16T23:09:47+5:302018-08-16T23:09:51+5:30
अरविंद कोकजे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : भारताने प्रजासत्ताक लोकशाही स्वीकारल्यानंतर देशात दोन बिगर काँग्रेस पंतप्रधान झाले. ते म्हणजे मोरारजी देसाई आणि अटलबिहारी वाजपेयी. आता नरेंद्र मोदी. मोरारजी देसाई काँग्रेस पक्षातून बाहेर पडून झालेले पंतप्रधान होते. त्यामुळे त्याना काँग्रेसी पंतप्रधान मानत. मात्र, वाजपेयी हे खऱ्या अर्थाने बिगर काँग्रेस पंतप्रधान झाले. देशातील विविध छोट्या प्रादेशिक पक्षांना बरोबर घेऊन त्यांनी देशाचे नेतृत्व केले. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर काश्मीर प्रश्न निर्माण झाला. त्यावेळी जनसंघाची स्थापना झाली. जनसंघ पक्षाचे स्थापनेपासून वाजपेयी त्या पक्षात होते. जनता पक्षाचा प्रयोग फसल्यानंतर जो भारतीय जनता पक्ष स्थापन झाला, त्याचे ते संस्थापक अध्यक्ष होते. त्यामुळे वाजपेयी पंतप्रधान झाल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. भाजपची दिल्लीत स्थापना झाली. त्यावेळी त्यांनी केलेल्या भाषणाचे साक्षीदार काही आहेत. त्यापैकी एक भाजपचे राज्याचे प्रमुख प्रवक्ते आणि राज्याचे पुनर्वसन समितीचे प्रमुख माधव भंडारी. भाजप स्थापनेनंतर ते रत्नागिरीत आले. त्यावेळी त्यांनी वाजपेयी संघर्षाचा मूड काय होता याचे वर्णन बलवंत साप्ताहिकाचे कार्यालयात केले होते. त्या संदर्भातील लेखही ‘बलवंत’मध्ये प्रसिद्ध करण्यात आला होता.
जनसंघ वा भाजप पक्षात वाजपेयी यांनी अनेक जबाबदाºया पार पाडल्या. त्या पार पाडताना त्यानी रत्नागिरी जिल्ह्यात (अविभाज्य) भेट फार दिली नाही. वाजपेयींचा दौरा असला की, कार्यकर्त्यांत उत्साहाचे वातावरण असायचे. कै. जनूभाऊ काळे, कै. यशवंतराव माने, कै. रामभाऊ सुर्वे, कै. तात्या नातू, कै. क्षेमाताई थत्ते, कै. डॉ. ज. शं. केळकर, गंगाधरभाऊ पटवर्धन, प्रेमजीभाई आसर अशी अनेक मंडळी त्यांच्या संपर्कात असत. या सर्वांशी त्यांचा संवाद होत असे. जनसंघाचा उमेदवार लोकसभेत कोकणातून प्रथम गेला तो संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाचेवेळी त्या घटनेची वाजपेयी यांनी नोंद घेतल्याची आठवण कै. जनूभाऊ काळे सांगत असत.
रत्नागिरी जिल्ह्यातील जनसंघ व त्यानंतर भाजपत पहिल्यापासून काम करणारे कै. जनूभाऊ काळे. त्यामुळे त्यांचे वरिष्ठ पातळीवरील नेत्यांशी संबंध होते. पक्षीय कामकाजाचे दृष्टीने ते वाजपेयींना विशेष परिचित होते.
कै. जनुभाऊ काळे आणि भाजपतील काही नेत्यांचे मतभेद झाल्यावर काळे भाजपला रामराम ठोकणार, अशा बातम्या प्रसारीत झाल्या. पक्ष पातळीवर माझ्यावर अन्याय झाला तरी तो मी सहन करीन. कारण जोपर्यंत वाजपेयी भाजपत आहेत, तोपर्यंत मी भाजपतच असणार आहे. वाजपेयींसारख्या नेत्याची वा नेतृत्वाशी मी प्रतारणा करणार नाही, असे काळे यांनी सांगितले होते. त्याप्रमाणे ते वाजपेयी यांचेच नेतृत्व मानत राहिले.
वाजपेयी रत्नागिरी शहरात तीन -चार वेळाच आले असावेत. वाजपेयी यांची पहिली सभा रत्नागिरी शहरातील पटवर्धन हायस्कूलच्या मैदानावर झाली होती. त्या सभेत माझी बहीण आणि तत्कालिन जनसंघाच्या महिला कार्यकर्त्या लीला मुकादम उपस्थित होत्या. त्या सभेच्या आठवणी त्या सांगत असत. त्यानंतर त्यांचा साठीनिमित्त रत्नागिरी शहरात जाहीर सत्कार आणि निधी समर्पणाचा कार्यक्रम झाला. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे पंतप्रधान झाल्यानंतर कोकण रेल्वे प्रकल्प राष्ट्राला अर्पण करण्यासाठी त्यांनी १९९८मध्ये रत्नागिरीला भेट दिली. या प्रत्येक वेळेस त्यांच्या भाषणाच्या निरनिराळ्या शेडस् पाहावयास मिळाल्या आणि भाषणही ऐकावयास मिळाले. वाजपेयी यांचे तेरा दिवसांचे सरकार संख्याबळाच्या खेळात पडले. त्यावेळी रत्नागिरी जिल्ह्यातील कार्यकर्त्यांत सन्नाटा पसरला होता. कै. जनूभाऊ काळे यांची अवस्था जवळून पाहिली. त्या पक्षातून सावरायला जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांना आठ-दहा दिवस लागले होते. जनता पक्षातून बाहेर पडल्यावर भाजपची स्थापना वाजपेयी-अडवाणी आदींनी केली. त्याचवेळी वाजपेयी यांच्या पाठीशी ठाम उभे राहण्याचा निर्धार जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी घेतला आणि भाजपची जिल्ह्यात स्थापना झाली.
जिल्ह्यातील तत्कालिन जनसंघ असो वा भाजप यांच्या मागे ते उभे राहिले. त्यांचे अनेक कार्यकर्ते आज काळाचे पडद्याआड गेले आहेत. पण वाजपेयींबरोबर लोकसभेत काम करणारे माजी खासदार अॅड. बापूसाहेब परुळेकर यांच्याजवळ आजही त्यांच्या अनेक आठवणी आहेत. वाजपेयी आणि रत्नागिरी जिल्हा, पक्ष कार्यकर्ते यांचे अतूट नाते होते. वाजपेयी यांना मानणारा कार्यकर्त्यांचा मोठा गट जिल्ह्यात होता व आजही आहे.
(लेखक रत्नागिरीतील बुजुर्ग पत्रकार तसेच राजकीय घडामोडींचे साक्षीदार आहेत.)