खानू येथील विहिरीत पडलेल्या बिबट्याची सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2019 09:47 AM2019-11-21T09:47:28+5:302019-11-21T09:48:57+5:30
बिबट्याची डरकाही त्यांना विहिरीच्या दिशेने ऐकू आली. आवाजाचा मागोवा घेत ते आणि शेजारील ग्रामस्थ विहिरीच्या दिशेने गेले. त्यांनी तत्काळ पाली येथील परिमंडल वन कार्यालय पाली येथे संपर्क साधला.
पाली : रत्नागिरी तालुक्यातील खानु गावामधी कोंडवाडी येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याला बाहेर काढून जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. हा बिबट्या तंदुरुस्त असून तो अडीच वर्षाच्या आसपास आहे. शिकारीचा पाठलाग करताना तो विहिरीत पडल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले आहे. या बिबट्याला चांदोली अभयारण्यात सोडण्यात येणार आहे.
खानु कोंडवाडी येथील माजी पोलीस पाटील अनंत गोपाळ सुवारे यांच्या परसबागेतील २५ फूट खोल विहिरीत बिबट्या पडल्याचे सकाळी ७ वाजता कळले. बिबट्याची डरकाही त्यांना विहिरीच्या दिशेने ऐकू आली. आवाजाचा मागोवा घेत ते आणि शेजारील ग्रामस्थ विहिरीच्या दिशेने गेले. त्यांनी तत्काळ पाली येथील परिमंडल वन कार्यालय पाली येथे संपर्क साधला. त्याचबरोबर खानु पोलीस पाटील अनंत कांबळे यांच्याशीही संपर्क साधून ही माहिती देण्यात आली.
परिमंडल वन अधिकारी गौतम कांबळे, वन अधिकारी सुरेश उपरे, वनपाल ना.सी. गावडे, व्ही.डी.कुंभार, सागर पाताडे, मिताली कुबल हे घटनास्थळी पिंजरा घेऊन दाखल झाले. कर्मचाऱ्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने पिंजरा विहिरीत सोडला. तब्बल दोन ते अडीच तासांच्या अथक प्रयत्नाने बिबट्या पिंजऱ्यात गेल्यावर त्याला विहिरीतून बाहेर काढण्यात आले.
यावेळी स्थानिक ग्रामस्थ प्रकाश कांबळे, दिनेश चाळके, दशरथ सावंत, संतोष गराटे, श्रीपत पेंढारी, महेंद्र पेंढारी, धनंजय चव्हाण यांच्यासह विभागीय वन अधिकारी र.सी.भवर, परिक्षेत्र वन अधिकारी प्रियांका लगड यांनी उपस्थित राहून मदत केली. बिबट्याला अभयारण्यात सोडण्यात येणार आहे.