दुचाकींच्या धडकेत सख्खे चुलतभाऊ ठार
By admin | Published: April 24, 2016 12:48 AM2016-04-24T00:48:32+5:302016-04-24T00:48:32+5:30
एक गंभीर : संगमेश्वर येथे अपघात
देवरुख : मुंबई-गोवा महामार्गावर दोन दुचाकीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एका मोटारसायकलवरील दोघेजण जागीच ठार झाले. तर सहावर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला. ही घटना शनिवारी दुपारी संगमेश्वर रेल्वेस्थानकासमोर घडली.
मृतांमध्ये आंबेड खुर्द तांबेवाडी येथील प्रतीक प्रकाश विंजळे (वय १७) व मोटारसायकलस्वार शैलेश विजय विंजळे (२८) या दोन सख्ख्या चुलतभावांचा समावेश आहे. त्यांचा आतेभाऊ निखिल रूपेश तांबे (६) हा गंभीर जखमी झाला आहे. त्याला अधिक उपचारांकरिता रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.
आंबेड खुर्द तांबेवाडी येथे शनिवारी विवाह सोहळा होता. विवाह झाल्यानंतर थंड पेय आणण्यासाठी म्हणून दुपारी अडीच वाजता शैलेश मोटारसायकल (एमएच ०८ क््यू ७९८७) घेऊन धामणीच्या दिशेने निघाला. त्याच्यासोबत प्रतीक व निखिल हेही होते. संगमेश्वर रेल्वेस्थानकासमोर महामार्गावर गोव्याच्या दिशेने वेगाने येणाऱ्या दुसऱ्या एका मोटारसायकलने त्यांना जोरदार धडक दिली. ही धडक एवढी मोठी होती क ी, तिघेही महामार्गावर कोेसळले. तिघांच्याही डोक्याला गंभीर दुखापत झाली. यात शैलेश व प्रतीक जागीच गतप्राण झाले.अपघात घडल्यानंतर वेगाने जाणाऱ्या दुचाकीस्वाराने आपली अपघातग्रस्त मोटारसायकल नजीकच्या पेट्रोलपंपाजवळ उभी करून दुसऱ्या मोटारसायकलने पलायन केले. या मोटारसायकलस्वाराचा शोध पोलिस घेत आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक मनोहर चिखले, वाहतूक पोलिस बाबा कदम, हेडकॉन्स्टेबल पवार यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केला. मृत दोघांचा मृतदेह संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला. रात्री उशिरा त्यांचे मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. यामुळे विंजळे कुटुंबातील विवाह सोहळ्यावर दु:खाचे सावट पसरले. तांबेवाडीमध्ये या घटनेमुळे हळहळ व्यक्त करण्यात आली. या घटनेबाबत अधिक तपास संगमेश्वर पोलिस करीत आहेत. (प्रतिनिधी)
नेत्यांनी नेले जखमीला रुग्णालयात
सहा वर्षीय निखिल यात गंभीर जखमी झाला आहे. अपघात घडला त्यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख राके श जाधव हे महामार्गावरून जात होते. त्यांनी निखिलला आपल्या वाहनात घेऊन संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्याची प्रकृती गंभीर असल्याने अधिक उपचारासाठी नरेंद्र महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकेतून जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.