दापाेलीत कचरामुक्त स्वच्छ नदीसाठी सायकल फेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:33 AM2021-09-25T04:33:34+5:302021-09-25T04:33:34+5:30
दापाेली : नदीचे नैसर्गिक चक्र बिघडू नये याबद्दल जनजागृती करण्यासाठी, तसेच कचरामुक्त स्वच्छ नदीसाठी दापाेलीतील सायकलिंग क्लबतर्फे रविवार, २६ ...
दापाेली : नदीचे नैसर्गिक चक्र बिघडू नये याबद्दल जनजागृती करण्यासाठी, तसेच कचरामुक्त स्वच्छ नदीसाठी दापाेलीतील सायकलिंग क्लबतर्फे रविवार, २६ सप्टेंबर २०२१ राेजी विनामूल्य सायकल फेरीचे आयाेजन करण्यात आले आहे. दापाेली शहरातील जाेग नदीला समांतर रस्त्यावरून ही फेरी काढण्यात येणार आहे.
नदी म्हणजे नैसर्गिक पाण्याचा प्रवाह, नदीला जीवनवाहिनीही म्हणतात. अनेक प्रकारचे सजीव, परजीवी सजीव व वनस्पती यांचे नदीवर अवलंबून असलेले एक स्वतंत्र जीवसृष्टीचे चक्र अस्तित्वात असते. हे जाणून घेण्यासाठी आणि नदीचे नैसर्गिक चक्र बिघडू नये याबद्दल जनजागृती करण्यासाठी ही सायकल फेरी असेल. ही सायकल फेरी आझाद मैदान ध्वजस्तंभ येथून सकाळी ७.३० वाजता सुरू हाेणार आहे. त्यानंतर आझाद मैदान-केळस्कर नाका-बाजारपेठ- हनुमान मंदिर- पंचायत समिती- प्रांत ऑफिस- काकोबा मंदिर- मौजे दापोली ग्रामपंचायत- साईमंदिर- विजयवाडी- शिवसाईनगर- बांधतिवरे रस्ता (उतार सुरू होईपर्यंत)- पोस्टाची गल्ली- आझाद मैदान, अशी ८ किलाेमीटर सायकल फेरी काढण्यात येणार आहे. आझाद मैदानात सकाळी ९.३० वाजता या फेरीचा समाराेप हाेणार आहे.
या सायकल फेरीसाठी कोणतेही प्रवेश शुल्क नसून कोणतीही सायकल घेऊन सर्व वयोगटातील सायकलप्रेमी सहभागी होऊ शकतात. सायकल फेरीमध्ये सायकल हळूहळू, एकाच्या मागोमाग सायकल चालावायची आहे. सायकल चालविताना हेल्मेट आवश्यक असून, हातात सायकल ग्लोव्हज् वापरावेत, असे आवाहन क्लबतर्फे करण्यात आले आहे.