साखरप्यात वन विभागाची मोठी कारवाई
By admin | Published: January 8, 2017 10:53 PM2017-01-08T22:53:45+5:302017-01-08T22:53:45+5:30
विनापरवाना लाकूड वाहतूक : सहा लाखांचा माल हस्तगत, वृक्षतोड करणाऱ्यांचे धाबे दणाणले...
देवरूख : रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावर विनापरवाना लाकूड वाहतूक करणाऱ्या ट्रकचालकावर वन विभागाने कारवाई करीत ट्रक जप्त केला आहे. ही कारवाई ६ जानेवारी रोजी रात्री साखरपा येथे करण्यात आली. यावेळी ५ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल वन विभागाने हस्तगत केला आहे.
संगमेश्वर तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी विनापरवाना जंगलतोडीला ऊत आला आहे. ग्रामीण भागात सर्रासपणे जंगलच्या जंगले भुईसपाट केली जातात आणि त्याची बिनदिक्कतपणे वाहतूक केली जाते, असा आरोप होत होता. काही ठिकाणी परवाना घेऊन वृक्षतोड केली जाते. तर काही ठिकाणी एकाच परवान्यावर अनेकवेळा वृक्षतोड करण्यात येते. तालुक्यातुन वृक्षतोडीबद्दल अनेक तकारी प्राप्त झाल्याने वन विभागाने या विनापरवाना वृक्षतोडीला चाप बसावा याकरिता मुर्शी तपासणी नाका येथे भरारी पथकाची नेमणूक केली होती. दरम्यान, साखरपा येथून विनापरवाना लाकडाची वाहतूक होणार असल्याची खबर वन विभागाला मिळाली होती.
त्यानंतर कोल्हापूर दक्षता पथकाचे विभागीय वन अधिकारी विजय भोसले, रत्नागिरीचे परिक्षेत्र वन अधिकारी बी. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा लावण्यात आला होता.
संगमेश्वर-देवरूख विभागाचे वनपाल विलास मुळे, वनरक्षक दिलीप आरेकर यांनी साखरपा हद्द्ीमध्ये रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावर लाड यांच्या पेट्रोल पंपाजवळ लांजा येथून कोल्हापूरकडे विनापरवाना लाकूड वाहतूक करणारा ट्रक (एमएच १३ आर ३०२३) मालक व चालक भारत नायकुडे (मुर्शी) याला मुद्देमालासह पकडले.
यावेळी ट्रक मुद्देमालासहित जप्त करण्यात आला. सुमारे ५ लाख ८५ हजार रुपयांचे लाकूड या ट्रकमध्ये सापडले. विनापरवाना लाकूड वाहतूक करणारा ट्रक कोल्हापूरच्या दिशेने निघाल्याची माहिती वन विभागाला मिळाली होती. यानुसार वन विभागच्या अधिकाऱ्यांनी यासाठी सापळा लावला होता. यावेळी वन विभागाने या ट्रकचा पाठलाग करत तो ताब्यात घेतला.
त्यानंतर ट्रकमधील लाकूड व कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. यावेळी ट्रकमधून विनापरवाना लाकडाची वाहतूक होत असल्याचे आढळून आले. वन विभागाचे एस. एन. सावंत, बी. बी. देसाई यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार ही कारवाई केली. (प्रतिनिधी)