भ्रष्टाचाराच्या सागरात बडे मासे ‘गळा’ला...?

By admin | Published: April 20, 2016 10:17 PM2016-04-20T22:17:49+5:302016-04-20T22:17:49+5:30

लाचलुचपत’ची मोहीम: लाचखोरीची कीड सर्वदूर फोफावली..

Big fish in the ocean of corruption ...? | भ्रष्टाचाराच्या सागरात बडे मासे ‘गळा’ला...?

भ्रष्टाचाराच्या सागरात बडे मासे ‘गळा’ला...?

Next

 प्रकाश वराडकर ल्ल रत्नागिरी
शासकीय, निमशासकीय कार्यालये तसेच अन्य विभागांतही भ्रष्टाचाराची कीड गेल्या काही वर्षात सर्वदूर फोफावली आहे. समाज पोखरणारी व प्रत्येक कामात सर्वसामान्य जनतेचे आर्थिक लचके तोडणारी ही कीड ठेचण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गेल्या चार वर्षांच्या काळात जोमाने पावले उचलली आहेत. त्यामध्ये चिरीमिरी भ्रष्टाचारात गुंतलेल्यांबरोबरच काही बडे मासेही गळाला लागले आहेत. जिल्ह्यातील आणखी काही बडे मासे जाळ्यात अडकण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
रत्नागिरी विभागात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जानेवारी २०१६पासून आतापर्यंत चार कारवाया केल्या असून, त्यातील दोन कारवाया मोठ्या अधिकाऱ्यांवरील आहेत. या काळात प्रथम देवरुखमधील माळवाशी तलाठी संजय जाधव याला जमिनीच्या कागदपत्रांसाठी ५००० रुपये लाच घेताना पकडण्यात आले. त्यानंतर मंडणगड येथील ग्रामीण रुग्णालयाच्या डॉ. प्रभाकर भावठानकर यांना रुग्णाकडून ५०० रुपये घेताना अटक झाली.
पोलीस खात्यातही भ्रष्टाचाराची बजबजपुरी निर्माण झाली असून, दाभोळचे पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग चव्हाण यांना ३५ हजारांची लाच स्वीकारताना पकडण्यात आले. दापोली तालुक्यातील पालगडचे तलाठी संजय गावकर याला २ हजारांची लाच घेताना अटक झाली. २०१६ च्या पहिल्या चार महिन्यात चार जणांवर भ्रष्टाचाराबाबतची कारवाई झाली असून, मोठे अधिकारीही यात गुंतल्याचे पुढे आले आहे. सर्व प्रकारच्या शासकीय सुविधा उपलब्ध असतानाही हे अधिकारी भ्रष्टाचारात गुंतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
याबाबत माहिती देताना रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक सतीशकुमार गुरव यांनी सांगितले की, जिल्ह्यात महसूल विभागातील भ्रष्टाचाराबाबत या विभागाकडे अधिक प्रमाणात तक्रारी येत आहेत. अन्य विभागांतही कामांच्या पूर्ततेसाठी आर्थिक व्यवहार होत असल्याची चर्चा आहे. निनावी पत्रांद्वारेही काही खात्यातील भ्रष्टाचाराची माहिती विभागाला मिळाली आहे. रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाचखोरांविरोधात केलेल्या कारवाईचे प्रमाण वाढले आहे. यावर्षी पहिल्या साडेतीन महिन्यातच लाचखोरांवर चार प्रकरणात कारवाया झाल्या आहेत. २०१४ सालात १२ प्रकरणांमध्ये लाचखोरांवर कारवाई झाली. २०१५ सालातही १२ कारवाया झाल्या व एका प्रकरणाचा तपास झाला. काही तलाठी, ग्रामसेवक, वैद्यकीय अधिकारी, अन्य लोकसेवक भ्रष्टाचारात गुंतल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे लाचखोरांविरोधातील मोहीम अधिक तीव्र केली जाणार आहे.
सतीशकुमार गुरव : महसूल विभागाच्याच सर्वाधिक तक्रारी....
गेल्या दोन वर्षात लाचखोरांवरील कारवाईसाठी विभागाचे कर्मचारी संपूर्ण जिल्ह्यात फिरत आहेत. भ्रष्टाचाराची कुजबूज असलेल्या सरकारी कार्यालयात वेशांतर करूनही भ्रष्टाचाराने त्रस्त लोकांना भेटून लाच मागणारे अधिकारी, कर्मचाऱ्यांविरोधात तक्रार दाखल करण्याचे आवाहन केले जात असल्याचे उपअधीक्षक गुरव म्हणाले.
व्यापक कारवाई...
रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात सध्या उपअधीक्षक, २ पोलीस निरीक्षक व १० पोलीस कर्मचारी उपलब्ध आहेत. या कर्मचारी संख्येचा सुयोग्य वापर करीत या वर्षभरात भ्रष्टाचाऱ्यांविरोधातील कारवाई व्यापक केली जाणार आहे.

Web Title: Big fish in the ocean of corruption ...?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.