चिपळुणात वाहतूक कोंडीने फुटला घाम, गणेशोत्सवासाठी चाकरमानी काेकणात दाखल
By संदीप बांद्रे | Published: September 20, 2023 04:48 PM2023-09-20T16:48:55+5:302023-09-20T16:49:12+5:30
चिपळूण : गणेशोत्सवासाठी यावर्षी काेकणात मोठ्या प्रमाणात मुंबईकर दाखल झाले आहेत. त्यामुळे महामार्गावर एसटीच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. ...
चिपळूण : गणेशोत्सवासाठी यावर्षी काेकणात मोठ्या प्रमाणात मुंबईकर दाखल झाले आहेत. त्यामुळे महामार्गावर एसटीच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. खासगी वाहनांचीही संख्या वाढली आली आहे. निवडणुका डाेळ्यासमाेर ठेवून यावर्षी मुंबईकरांना एसटीला ‘स्पॉन्सरशिप’ मिळाली आहे. त्यामुळे हजारो गाड्या महामार्गावर धावत आहेत. मात्र, त्यामुळे वाहतूककोंडीने अक्षरशः घाम फुटला आहे.
महामार्गावरील वाहनांच्या वाढत्या रहदारीमुळे परशुराम घाट ते चिपळूण शहर परिसरात मोठी वाहतूक कोंडी होत आहे. जिल्ह्यामध्ये एसटीच्या अडीच हजारहून अधिक गाड्या दाखल झाल्या आहेत. परतीच्या प्रवासासाठी त्यातील काही गाड्या आत्ताच चिपळूण आगारात थांबवून घेण्यात आल्या आहेत. त्यामुळे शहरातील शिवाजीनगर बसस्थानक एसटीचा तळ बनले आहे. मात्र, ही जागा अपुरी पडत असल्याने चौपदरीकरण केलेल्या महामार्गावर ठिकठिकाणी एसटीच्या गाड्या थांबवून ठेवण्यात आल्या आहेत.
गणेशोत्सव काळात उड्डाणपुलाचे काम बंद ठेवावे, अशी मागणी केली जात होती, परंतु अद्याप हे काम सुरु आहे. त्यामुळे बहादूरशेख चौक येथे मोठी वाहतूक कोंडी होत आहे. चिपळूण शहर बाजारपेठेतही मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी जाणवत असून चाकरमान्यांच्या ज्यादा गाड्या बाजारपेठेतूनच सोडण्यात येत आहेत. चाकरमान्यांना सोडून येणाऱ्या रिकाम्या गाड्या गुहागर बायपास मार्गे न वळविता बाजारपेठेतून येत असल्याने शहरात मोठी वाहतूक कोंडी होत आहे.
सीएनजीचा तुटवडा
चिपळुणात सध्या सीएनजीचा तुटवडा जाणवत आहे. शहरालगत वालोपे, बहादूरशेख चौक, शिवाजीनगर एसटी स्थानक या ठिकाणी एकूण तीन सीएनजी पंप आहेत. सावर्डेमध्येही एक पंप आहे. मात्र, सध्या सीएनजीचा पुरवठा कमी पडत असून, निदान गणेशोत्सवासाठी मध्यवर्ती असणाऱ्या चिपळूणमध्ये सीएनजीचा पुरवठा चोवीस तास हवा. सद्यस्थितीत सीएनजी पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. त्यामुळे आधीच वाहतूक कोंडीत अडकलेले चाकरमानी पुन्हा सीएनजीसाठी खोळंबत आहेत.