जैवविविधता समित्या केवळ कागदावरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2019 11:36 PM2019-12-22T23:36:01+5:302019-12-22T23:36:19+5:30
रत्नागिरी : जैवविविधतेचे संवर्धन, जोपासना आणि पोषण करण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतींमध्ये जैवविविधता व्यवस्थापन समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. तसेच ...
रत्नागिरी : जैवविविधतेचे संवर्धन, जोपासना आणि पोषण करण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतींमध्ये जैवविविधता व्यवस्थापन समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. तसेच जैवविविधता नोंदवह्याही तयार करण्यात आल्या आहेत. मात्र, या समित्यांचे कामच सुरू झालेले नसल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाकडून देण्यात आली आहे.
या समित्यांना ३० डिसेंबरपर्यंत नोंदवह्यांचे काम पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जैवविविधता आढळून येते. मात्र, स्थानिक पातळीवर त्याचे संवर्धन, जोपासना आणि पोषण होत नाही. ग्रामपंचायतींच्या दुर्लक्षतेमुळे जैवविविधतेचा मोठा भाग नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. राज्य शासनाने जैवविविधता टिकविण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये ही समिती स्थापन करण्याबाबत सन २०१५मध्ये आदेश दिले होते. या आदेशानुसार जैवविविधतेबाबत जनजागृती करण्यासाठी आणि या समित्या स्थापन करण्यास मदतीसाठी शासनाने जिल्ह्यासाठी चार संस्थांची निवड केली होती. समित्या स्थापनेनंतर ३३ प्रकारच्या अर्जांमध्ये त्या-त्या ग्रामपचांयतींच्या हद्दीतील माहिती भरवून घेण्यात आली होती. मात्र, या समित्या केवळ कागदावरच राहिल्या असून, गेली चार वर्षे समित्या अकार्यरत राहिल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे समित्यांना मुदत दिली आहे. या नोंदवह्या मुदतीत पूर्ण न झाल्यास ग्रामपंचायतींवर कारवाई करण्याचे निर्देशही दिले आहेत.
समित्यांची कामे
जैवविविधता जोपासणे, टिकविणे, त्याचे पोषण करणे तसेच जैवविविधतेच्या पारंपरिक आणि आधुनिक माहितीचे संकलन करून त्याचा उपयोग समाजासाठी करून देणे गरजेचे आहे. परिसरातील जैवविविधतेच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठिकाणांना जैवविविधतेचा वारसा स्थान म्हणून जाहीर करून त्यांचे संरक्षण व विकास करणे, धोक्यात आलेल्या प्रजातींचे संरक्षण आणि पुनर्वसन करणे अशी कामे या समित्या करणार आहेत. जिल्ह्यातील वनऔषधी, वन्यप्राणी, पक्षी, सरपटणारे प्राणी, कीटक, पाळीव प्राणी, दुर्मीळ वन्यजीव आणि वनस्पतींचाही त्यामध्ये समावेश करण्यात आला आहे.