बायोगॅसचे उद्दिष्ट पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:29 AM2021-03-28T04:29:47+5:302021-03-28T04:29:47+5:30
लांजा : राष्ट्रीय बायोगॅस विकास योजनेतंर्गत लांजा पंचायत समितीच्या कृषी विभागाकडून तालुक्यात १५ बायोगॅस उभारण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले ...
लांजा : राष्ट्रीय बायोगॅस विकास योजनेतंर्गत लांजा पंचायत समितीच्या कृषी विभागाकडून तालुक्यात १५ बायोगॅस उभारण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले आहे. कृषी विभागाने सविस्तर मार्गदर्शन करून १०० टक्के उद्दिष्टपूर्ती केली असल्याने कृषी विभागाच्या कामाचे कौतुक करण्यात येत आहे.
पालखी देवळातच
देवरुख : ग्रामदेवता श्री देवी सोळजाईचा शिमगोत्सव साधेपणाने साजरा होणार आहे. कोरोनामुळे घरोघरी जाणारी पालखी यावर्षी देवळातच ठेवली जाणार आहे. कोरोनामुळे शिमगोत्सव धार्मिक रिवाजाने साजरा केला जात असला तरी शासकीय नियमावलीचे पालन करण्यात येणार आहे.
प्रशिक मर्चंडे याचे यश
मंडणगड : चौदावी जिल्हा ओपन चॅलेंज फाईट व आठवी पुमसे तायक्वाँदो चॅम्पियनशिप स्पर्धा नुकतीच खेड येथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत मंडणगड तालुका तायक्वॉंदो अकादमीच्या प्रशिक मर्चंडे याने २१ किलो वजनीगटात रौप्यपदक पटकावले आहे.
वीजबिल माफीची मागणी
मंडणगड : येथील संभाजी ब्रिगेड तालुका मंडणगड शाखेतर्फे महावितरण कार्यालयास भेट देऊन कृषी वीजबिल व वीजतोडणी याबाबत उपकार्यकारी अभियंता मंडणगड यांना निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष भरत सप्रे, तालुका कार्याध्यक्ष श्रीकांत जाधव, सल्लागार चिंतामणी गायकवाड आदी उपस्थित होते.
पेन्शन योजनेत प्रथम
रत्नागिरी : महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमधून राष्ट्रीय पेन्शन योजना राबविण्याच्या सूचना २००५ नंतर करण्यात आल्या होत्या. त्यांचे काम अनेक जिल्ह्यांनी अपूर्ण ठेवले असताना रत्नागिरी विभागाकडून १४६७ शिक्षकांचे राष्ट्रीय पेन्शन योजनेत नावे समाविष्ट करुन ही योजना १०० टक्के यशस्वी केली आहे.
वीजबिल भरणा केंद्र सुरू
रत्नागिरी : शिमगोत्सवामुळे सलग सुटी आहे. परंतु वीजबिल वसुली मोहीम सुरू आहे. या काळात शिमगोत्सवही उत्साहाने साजरा केला जातो. ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी महावितरण कंपनीने स्वत:ची सर्व वीजबिल भरणा केंद्र ३१ पर्यंत सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
जूनमध्ये विशेष परीक्षा
रत्नागिरी : कोरोनामुळे परीक्षा देऊ न शकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जूनमध्ये विशेष परीक्षा घेण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. कोरोनामुळे १० वी व १२ वीचे विद्यार्थी आता परीक्षा देऊ शकणार नाहीत. त्या मुलांसाठी जूनमध्ये विशेष परीक्षा घेण्यात येणार आहे.
जागुष्टे यांची निवड
चिपळूण : सहाय्यक धर्मादाय आयुक्त महासंघाने स्थापन केलेल्या सेतू समितीवर शहरातील राजेश जोष्टे यांची अशासकीय निमंत्रित सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. या समितीत जागुष्टे यांचा समावेश केल्याबद्दल देवरुख व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रसाद सावंत व पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
ओल्या काजूगरांना मागणी
रत्नागिरी : बाजारात ओले काजूगर मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी उपलब्ध आहेत. १० रुपयाला तीन ते चार नग दराने विक्री सुरू आहे. पर्यटकांकडून ओल्या काजूगरांची आवर्जून खरेदी केली जात आहे. ६०० ते ७०० रुपये किलो दराने काजूगर विक्री करण्यात येत आहे. ग्रामीण भागातील महिला काजू विक्रीसाठी शहरात येत आहेत.