क्रांतिवीरांची जीवनचरित्रे स्फूर्तिदायी : अन्वर मोडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:35 AM2021-08-12T04:35:31+5:302021-08-12T04:35:31+5:30
सावर्डे : क्रांतीच्या वणव्यातून स्वातंत्र्याची पहाट उगवली. भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात त्याग, समर्पणाची परिसीमा गाठलेल्या क्रांतिकारी, स्वातंत्र्यसैनिक यांच्यासह प्राणांची आहुती देणाऱ्या ...
सावर्डे : क्रांतीच्या वणव्यातून स्वातंत्र्याची पहाट उगवली. भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात त्याग, समर्पणाची परिसीमा गाठलेल्या क्रांतिकारी, स्वातंत्र्यसैनिक यांच्यासह प्राणांची आहुती देणाऱ्या वीरांची जीवनचरित्रे आपणा सर्वांसाठी स्फूर्तिदायक आहेत. त्यांचे वाचन करून अवलोकन करणे ही आजची गरज आहे, असे आवाहन विद्यालयाचे मुख्याध्यापक अन्वर मोडक यांनी केले.
सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात क्रांतिदिन साजरा करण्यात आला. सुरुवातीला विद्यालयाचे मुख्याध्यापक अन्वर मोडक, उपमुख्याध्यापिका मुग्धा पंडित व ज्येष्ठ शिक्षक विजय काटे यांच्या हस्ते आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. जयंत काकडे व अविनाश पोतदार यांनी क्रांतिदिनाची माहिती करून देणारे सचित्र भित्तिपत्रक तयार केले. त्याचे उद्घाटन विद्यालयाचे क्रीडाशिक्षक उदयराज कळंबे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी ऑफलाइन व विद्यार्थी ऑनलाइन उपस्थित होते. मुख्याध्यापक अन्वर मोडक पुढे म्हणाले की, ब्रिटिशांची जुलमी राजवट उलथवून टाकण्याची ऊर्मी भारतीयांच्या नसानसांत भिनविण्याचे कामच मुळी क्रांतिदिनाने केले. संपूर्ण भारत पेटून उठला व स्वातंत्र्याची चाहूल लागली. क्रांतिवीरांच्या बलिदानानेच आपण आज स्वातंत्र्य उपभोगत आहोत, असे त्यांनी सांगितले. अविनाश पोतदार यांनी आभार मानले.