पूरस्थितीच्या संकटामुळे वाढदिवस कार्यक्रम रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:33 AM2021-07-27T04:33:26+5:302021-07-27T04:33:26+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क खेड : राज्यभरात अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीत अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. ही परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
खेड : राज्यभरात अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीत अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. ही परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी आपल्याला खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. त्यामुळे माझ्या वाढदिवसानिमित्त कुणीही शुभेच्छा द्यायला येऊ नये. पुष्पहार, पुप्षगुच्छ आदीसाठी होणारा खर्च आपद्ग्रस्तांसाठी मदत म्हणून द्यावा, असे आवाहन शिवसेना नेते रामदास कदम यांनी केले आहे.
खेड, चिपळूणमधील पूरस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी दापोली मतदारसंघाचे आमदार योगेश कदम व युवानेते सिध्देश कदम दिवसरात्र मेहनत घेत आहेत. या परिस्थितीत कुणीही डगमगू नये. गेले चार दिवस पूरस्थितीत खचलेल्या व्यापारी आणि नागरिकांना दिलासा देण्यासाठी सर्वजण झटत आहेत. या अनुषंगाने सर्वतोपरी प्रयत्न सुरू असून, पूरग्रस्तांना आवश्यक त्या वस्तूंचे वाटपही सुरू आहे. या पुरामध्ये नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, शक्य तेवढे जास्तीत जास्त सहकार्य जनतेला कसे करता येईल याकडे आपण सर्वांनी लक्ष द्यावे. आपल्या बांधवांना पुन्हा उभे करण्यासाठी आपण सारे प्रयत्न करा, असे आवाहन रामदास कदम यांनी केले आहे.
---
पूरग्रस्तांसाठी आवश्यक साहित्य वाटप करण्यासाठी युवासेना राज्य कार्यकारिणी सदस्य सिद्धेश कदम यांची मोठी मदत मिळाली आहे. शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, युवती सेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या प्रमाणात मदतकार्यासाठी मेहनत घेत आहेत. सिध्देश कदम व शिवतेज आरोग्य सेवा संस्थेतर्फे पूरग्रस्त भागातील नागरिकांची आरोग्य तपासणी सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती आमदार योगेश कदम यांनी दिली.
---
शिवसेना महिला आघाडीतर्फे मंगळवारी (२७ जुलै) पूरग्रस्तांना मदतीचे वाटप करण्यात येणार आहे. कपडे, जीवनावश्यक वस्तू, ब्लँकेट, शर्ट, ड्रायफ्रुट, मॅगी, बिस्कीट पॅकेट्स, डाळ, तांदूळ, गहू, तेल, साबण, कडधान्य, पिण्याच्या पाण्याच्या बॉटल अशा सर्व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येणार आहे.