भाजप बनले अवघड जागेचे दुखणे
By admin | Published: October 23, 2014 10:14 PM2014-10-23T22:14:41+5:302014-10-23T22:49:32+5:30
युती तुटली अन्... : पंचायत समिती, जिल्हा परिषदेतील स्थिती
रत्नागिरी : जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपद आणि रत्नागिरी पंचायत समितीचे उपसभापतीपदी भाजपकडे असल्याने आता विधानसभेच्या निवडणुकीनंतर युती तुटल्याने आता अडीच वर्षासाठी ही दोन्ही पदे भाजपकडेच राहण्याची चिन्ह आहेत़ पुरेसे संख्याबळ नसतानाही भाजपचे सदस्य या दोन्ही पदांवर राहणार आहेत़
जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये शिवसेना - भाजपची मागील २५ वर्षांपासूनची युती आहे़ विधानसभेच्या निवडणुकीत युती तुटल्याने त्याचे परिणाम जिल्हा परिषद, पंचायत समित्यांमधील युतीवर होईल, असे वाटत होते़ मात्र, जिल्हा परिषद अध्यक्ष व विषय समित्यांच्या निवडणुकीमध्येही भाजपच्या जिल्हा परिषद सदस्यांनी शिवसेनेबरोबर राहण्याची भूमिका प्रामाणिकपणे निभावली़
विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप सर्वांत मोठा पक्ष उदयास आल्याने शिवसेनेला बरोबर घेण्यावरुन अजूनही एकमत झालेले नाही़ वेळ पडल्यास शिवसेनेने विरोधी बाकावर बसण्याची भूमिका जाहीर केली होती़ त्यामुळे आता नगर परिषद, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेतील युती राहणार की, तुटणार असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे़ राज्यस्तरावर युती तुटली असली तरी जिल्हा व तालुकास्तरावर शिवसेनेची ताकद जास्त असल्याने भाजपला कोंडीत पकडणे सोपे नाही़ त्यामुळे आता पंचायत समिती व जिल्हा परिषदेमध्ये भाजप हे शिवसेनेचे अवघड जागेचे दुखणे ठरणार आहे़ कारण रत्नागिरी पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेत शिवसेनेचे संख्याबळ असले तरी महत्त्वाचे उपसभापती आणि उपाध्यक्ष ही पदे भाजपकडे राहणार आहेत़ कारण जिल्हा परिषदेत शिवसेनेचे २६ सदस्य असले तरी अविश्वास ठरावही आणू शकत नाहीत़ तसेच उपाध्यक्ष सतीश शेवडे पुढील अडीच वर्षांपर्यंत राजीनामा देणार नाहीत, निश्चित आहे़ पुढील अडीच वर्षे शिवसेनेला जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपद व रत्नागिरी पंचायत समितीतील उपसभापतीपदावर संख्याबळ असतानाही आपल्या सदस्याची निवड करता येणार नाही़ (शहर वार्ताहर)