घड्याळाचा उमेदवार ही भाजपचीच सुपारी, उदय सामंत यांचा घणाघाती आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2019 05:04 PM2019-12-25T17:04:42+5:302019-12-25T17:05:55+5:30
रत्नागिरीच्या थेट नगराध्यक्ष निवडणुकीत येथील काही लोकांनी हट्टाने भाजपची सुपारी घेऊन शिवसेनेतून आयात केलेल्या उमेदवाराला घड्याळ निशाणीवर उमेदवार म्हणून उभे केले आहे. मात्र, या निर्णयाशी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचा सुतराम संबंध नाही. भाजपचे चाणक्य व राष्ट्रवादीतील काही स्थानिकांचे हे षड्यंत्र रत्नागिरीतील जनता उधळून लावेल, असा दावा आमदार उदय सामंत यांनी केला.
रत्नागिरी : रत्नागिरीच्या थेट नगराध्यक्ष निवडणुकीत येथील काही लोकांनी हट्टाने भाजपची सुपारी घेऊन शिवसेनेतून आयात केलेल्या उमेदवाराला घड्याळ निशाणीवर उमेदवार म्हणून उभे केले आहे. मात्र, या निर्णयाशी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचा सुतराम संबंध नाही. भाजपचे चाणक्य व राष्ट्रवादीतील काही स्थानिकांचे हे षड्यंत्र रत्नागिरीतील जनता उधळून लावेल, असा दावा आमदार उदय सामंत यांनी केला.
सामंत म्हणाले, रत्नागिरीच्या थेट नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शहरात मी, बंड्या साळवी आणि शिवसेनेचे सर्व पदाधिकारी प्रचार करीत आहोत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी जो महत्त्वाचा निर्णय घेतला आहे तो रत्नागिरीच्या लोकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या यापुढील निवडणुका या महाविकास आघाडीतर्फे लढविल्या जातील, अशी चर्चा झाली आहे. परंतु काही लोकांच्या हट्टामुळे आमचा मित्रपक्ष राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या घड्याळ निशाणीवर लढतोय, हे दुर्दैवी आहे.
राष्ट्रवादीचे नेते बशीर मुर्तुझा किंवा राष्ट्रवादीचा अन्य कोणताही उमेदवार नगराध्यक्ष निवडणुकीसाठी उभा राहिला असता तर आम्ही समजू शकलो असतो. परंतु मिलिंद कीर यांना शिवसेनेतून आयात करून त्यांना राष्ट्रवादी कॉँग्रेसचे घड्याळ चिन्ह दिले आहे. याबाबत पक्षाच्या राज्यस्तरीय नेत्यांना माहिती नाही. त्यामुळे हा उमेदवार राज्यस्तरीय नेत्यांना चुकीची माहिती देऊन उभा केलेला उमेदवार आहे. राष्ट्रवादीचा हा उमेदवार असताना मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेवरच टीका करीत आहे.
भाजप चाणक्याचे षड्यंत्र!
भाजपमध्ये रत्नागिरीतही काही चाणक्य आहेत. त्यातीलच चाणक्याने राष्ट्रवादीकडून या उमेदवाराला घड्याळ निशाणी घ्यायला लावली आहे. शिवसेनेवर प्रेम करणाऱ्या मुस्लिम मतदारांची मते मिळवणे, हा या षड्यंत्राचा भाग आहे. परंतु लोक ते यशस्वी होऊ देणार नाहीत, दावाही सामंत यांनी केला.
शिवसेनेत यावे लागेल
काहीजण नगराध्यक्षपदाच्या या निवडणुकीत शिवसेनेच्या काळात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करीत आहेत. हे आरोप सिध्द झाले तर शिवसेना यापुढे नगराध्यक्ष निवडणूक लढविणार नाही. मात्र, आरोप सिध्द झाले नाहीत तर आरोप करणाऱ्यांना शिवसेनेत यावे लागेल, असा टोलाही आमदार सामंत यांनी लगावला.