Narayan Rane: महाराष्ट्रात आमचं सरकार येणार; मी यांचे पराक्रम जनतेसमोर आणणार- नारायण राणे
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2021 03:54 PM2021-08-27T15:54:50+5:302021-08-27T16:08:53+5:30
घरात, पिंजऱ्यात राहून कुणी बोलतं का?, असा सवाल उपस्थित करत नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांना टोला देखील लगावला.
रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथे झालेल्या पोलिसांच्या कारवाईनंतर नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा आजपासून पुन्हा रत्नागिरी शहरातून सुरू झाली. या यात्रेदरम्यान नारायण राणे यांनी माध्यमांशी संवाद साधत पुन्हा एकदा राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
महाविकास आघाडीचं सरकार येऊन जवळपास २ वर्षे झाली आहेत. या २ वर्षांत कोकणाला काय दिलं, असा सवाल राणेंनी उपस्थित केला. दादागिरी करू नका, माझ्या वाट्याला जाऊ नका, असा गर्भित इशारा त्यांनी दिला. मी यांचे सर्व पराक्रम जनतेसमोर आणणार, असा इशारा देखील राणेंनी दिली. तसेच आगामी निवडणूकीत भाजपाचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार, असं त्यांनी सांगितलं.
कोकणात यापुढे आमदार आणि खासदार भाजपाचे असणार असं सांगत महाराष्ट्रात भविष्यात आमचं सरकार येणार, असा दावा देखील नारायण राणे यांनी केला. तसेच घरात, पिंजऱ्यात राहून कुणी बोलतं का?, असा सवाल उपस्थित करत नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांना टोला देखील लगावला. त्याचप्रमाणे माझ्या घराबाहेर आलेल्या 'चिव'सैनिकांचा सत्कार झाला; मात्र पोलिसांनी त्यांना चोप-चोप चोपला, असा टोला देखील नारायण राणे यांनी यावेळी लगावला.
प्रचंड अडचणींना सामोरं जात दर वेळी निधड्या छातीने शत्रूंवर चाल करत स्वराज्याची स्थापना करणाऱ्या क्षत्रियकुलावतंस स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला माल्यार्पण करत जन आशीर्वाद यात्रेला रत्नागिरी येथून पुन्हा प्रारंभ केला.#JanAshirwadYatrapic.twitter.com/wwcU22Ti3M
— Narayan Rane (@MeNarayanRane) August 27, 2021
सिंधुदुर्गात बॅनरवॉर-
केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या जनआशीर्वाद यात्रेच्या पार्श्वभूमीवर आता सिंधुदुर्ग जिल्ह्यात बॅनरवॉर पाहायला मिळत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ठिकठिकाणी भाजपकडून नारायण राणेंचे बॅनर्स लावण्यात आले आहेत. तर कणकवलीत शिवसेनेची बॅनरबाजी पाहायला मिळत आहे. शिवसेना आमदार वैभव नाईक यांच्या कणकवलीतील कार्यालयाबाहेरही बॅनर लावण्यात आले आहेत. सिंधुदुर्गात सर्वत्र नारायण राणे यांच्या स्वागताचे बॅनर भाजप कार्यकर्त्यांनी लावले आहेत. आज संध्याकाळात राणे यांचं सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणार आहेत. त्यामुळे आता जिल्ह्यात शिवसेना आणि भाजपचं बॅनर युद्ध पाहायला मिळत आहे. वैभव नाईक यांनी लावलेल्या बॅनर्सची कणकवलीत चर्चा सुरु आहे.
काही जणांना सत्तेची मस्ती आलीय. ती मस्ती दाखवण्याचा प्रयत्न होतोय. भविष्यात राज्यात आमची सत्ता येईल. पोलिसांनी कायद्याच्या चौकटीत राहून कारवाई करावी. अन्यथा पुढे कारवाईचा सामना करावा लागेल- केंद्रीय मंत्री नारायण राणे https://t.co/CbvSFUjpi9pic.twitter.com/pm6JDM1U3c
— Lokmat (@MiLOKMAT) August 27, 2021