सातारचेही ठरले, पण रत्नागिरी-सिंधुदुर्गात बेभरवशी राजकीय हवामान

By मनोज मुळ्ये | Published: April 16, 2024 03:38 PM2024-04-16T15:38:44+5:302024-04-16T15:39:52+5:30

सामंत यांचा विश्वास कायम

BJP has yet to announce its candidate for Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha constituency | सातारचेही ठरले, पण रत्नागिरी-सिंधुदुर्गात बेभरवशी राजकीय हवामान

सातारचेही ठरले, पण रत्नागिरी-सिंधुदुर्गात बेभरवशी राजकीय हवामान

रत्नागिरी : अनेक दिवस वादग्रस्त झालेला, मोठ्या उलथापालथी घडण्याची शक्यता असलेल्या सातारा लोकसभा मतदार संघातही महायुतीचा उमेदवार ठरला आणि मंगळवारी जाहीर झाला. पण रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात मात्र उमेदवाराची घोषणा अजूनही झालेली नाही. आता उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शेवटचे तीन दिवस बाकी आहेत आणि भाजप आणि शिंदेसेनेच्या गोटात फक्त ‘आमचं ठरलंय’ अशीच चर्चा आहे. महायुतीतील बेभरवशी हवामानामुळे कोणत्या पक्षाला फळ मिळणार, हे कोडे अजून कायम आहे.

रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात भाजप आणि शिंदेसेना उमेदवारीसाठी आपला आग्रह अजूनही कायम ठेवून आहे. दोन्ही पक्षांनी आपापल्या पद्धतीने प्रचारही सुरू ठेवला आहे. आमचं ठरलंय असे दोन्ही पक्ष सांगत आहेत. पण महायुतीकडून इतक्यावेळा उमेदवारांच्या नावाची यादी प्रसिद्ध झाली, त्यात अजून रत्नागिरी - सिंधुदुर्ग मतदार संघाचे नाव मात्र आलेले नाही.

सातारा लोकसभा मतदार संघातही उमेदवारीबाबत पेच होता. सातारा येथील उमेदवारीची घोषणाही बराच काळ रखडली होती. आता मंगळवारी १६ एप्रिलला ती घोषणाही करुन झाली. पण रत्नागिरी - सिंधुदुर्ग मतदार संघाबाबत अजूनही महायुतीचे नेते मौन पाळून आहेत. उमेदवारी अर्ज भरायची अंतिम मुदत १९ आहे. तोपर्यंत उमेदवाराची घोषणा केली जाईल, असेच महायुतीचे नेते सांगत आहेत. सद्यस्थितीत महायुतीला विजयी करा, एवढाच प्रचार दोन्ही पक्षांकडून सुरू आहे.

राणे यांचा सहभाग बोलका

खासदार नारायण राणे प्रत्येक तालुक्याचा दौरा करत आहेत. सभा, बैठका घेत आहेत. स्वपक्षासाेबतच मित्रपक्षातील लोकांच्याही गाठीभेटी घेत आहेत. त्यांचा हा प्रचारातील प्रत्यक्ष सहभाग पाहता त्यांची उमेदवारी अंतिम आहे, असे भाजपकडून मानले जात आहे. इतका प्रचार केल्यानंतर राणे यांना एक पाऊल मागे येण्यास सांगितले जाणार नाही. आयत्यावेळी चमत्कार हाेण्याची शक्यता आता मावळली आहे, असेही भाजपचे नेते कुजबुजत आहेत.

सामंत यांचा विश्वास कायम

रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाची जागा शिवसेनेची आहे. त्यामुळे ती जागा शिंदेसेनेलाच मिळेल, असा विश्वास मंत्री उदय सामंत आजही व्यक्त करत आहेत. कोकणातील मतदार पारंपरिकदृष्ट्या शिवसेनेचा आहे. त्यामुळे धनुष्यबाणालाच येथे उमेदवारी मिळेल, असा विश्वास उदय सामंत तसेच किरण सामंत यांनी सातत्याने व्यक्त केला आहे. त्यामुळे उमेदवारीचा संभ्रम कायम आहे.

Web Title: BJP has yet to announce its candidate for Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.