Kirit Somaiya: मंत्री परबांचे रिसॉर्ट पाडण्यासाठी निघालेल्या सोमय्यांना पोलिसांनी कशेडी घाटातच रोखले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2022 03:52 PM2022-03-26T15:52:10+5:302022-03-26T16:07:04+5:30
नोटीस स्वीकारल्यानंतरही ते दापोलीत जाण्यावर ठाम होते.
रत्नागिरी : परिवहन मंत्री अनिल परब यांच्या दापोली तालुक्यातील मुरुड येथील रिसॉर्ट पाडण्यासाठी भाजप नेते किरीट सोमय्या आज दापोलीत आले आहेत. मात्र, त्यांना राष्ट्रवादी आणि शिवसेनेसह हॉटेल व्यावसायिकांनी विरोध केल्याने वातावरण तापले आहे. जिल्ह्याचे प्रवेशद्वार असलेल्या खेड तालुक्यातील कशेडी घाटात किरीट सोमय्या येताच पोलिसांनी त्यांना तेथे रोखले आणि नोटीस बजावली.
हे रिसॉर्ट पाडण्यासाठी किरीट सोमय्या आज दापोली दौऱ्यावर आले आहेत. मुंबईतून चक्क हातोडा घेऊनच दापोलीकडे रवाना झाले. मात्र, या त्यांच्या दौऱ्याला राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम यांच्यासह शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना विरोध केला आहे. त्यांना दापोलीतच रोखण्याचा इशारा दिला आहे. त्याचबरोबर दापोलीतील हॉटेल व्यावसायिकांनीही सोमय्या यांना विरोध केला आहे. त्यामुळे शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते एकमेकांसमोर भिडण्याची शक्यता आहे.
दरम्यान, दुपारी सोमय्या कशेडी घाटात येताच पोलिसांनी त्यांना तेथे रोखले व नोटीस बजावली. सोमय्या यांनी ही नोटीस घेतली मात्र त्यावर सही केली नाही. ही नोटीस स्वीकारण्यासाठी पोलिसांनी विनंती केल्यानंतरच त्यांनी ही नोटीस स्वीकारली. पण त्यावर सही करण्यास नकार दिला. ही नोटीस स्वीकारल्यानंतरही ते दापोलीत जाण्यावर ठाम होते. त्यानंतर ते कशेडी घाटातून खेडकडे रवाना झाले.