भाजपचे नेतृत्व राष्ट्रवादीशी लढू शकत नाही

By admin | Published: May 30, 2016 10:54 PM2016-05-30T22:54:36+5:302016-05-31T00:32:37+5:30

भास्कर जाधव : गुहागर तालुक्यातील तळवली येथे अंगणवाडी, भेळवाडीत पाणी योजनेचे उद्घाटन

BJP leadership can not fight with NCP | भाजपचे नेतृत्व राष्ट्रवादीशी लढू शकत नाही

भाजपचे नेतृत्व राष्ट्रवादीशी लढू शकत नाही

Next

गुहागर : जिल्ह्यावरून भाजपची लोकं येऊन इथं बैठका घेऊ लागली आहेत, याचा अर्थ भाजपच तालुक्यामधील नेतृत्व आता राष्ट्रवादी काँग्रेसशी लढू शकत नाही, हे स्पष्ट झालं आहे, असा टोला माजी मंत्री, आमदार भास्कर जाधव यांनी लगावला. तालुक्यातील तळवली येथे विविध विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
तळवली गावातील बौध्दवाडी येथे बांधण्यात आलेली अंगणवाडी आणि भेळवाडी येथील पाणी योजनेचे उद्घाटन आमदार जाधव यांच्या हस्ते झाले. त्यानंतर गावच्या श्री सोमनागेश्वर मंदिराच्या आवारात आयोजित कार्यक्रमात जाधव यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी तालुकाध्यक्ष विनायक मुळ्ये, जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर आरेकर, पंचायत समिती सभापती विलास वाघे, उपसभापती सुनील जाधव, जिल्हा परिषद सदस्या विभावरी मुळ्ये, पंचायत समिती सदस्या साक्षी शितप, माजी उपसभापती सुरेश सावंत, माजी सदस्य प्रभाकर शिर्के, विभागीय अध्यक्ष इम्रान घारे, गटविकास अधिकारी बी. ई. साठे, सरपंच यशोदा सांगळे, उपसरपंच राकेश पवार, माजी सरपंच मारूती जाधव, तंटामुक्त समिती अध्यक्ष शिगवण, शिवसेनेचे उपविभागप्रमुख संतोष आग्रे, निगुंडळच्या सरपंच सुमित्रा नाणीजकर, तळवली गटविकास मंडळाचे अध्यक्ष दत्तकुमार शिगवण, दत्तात्रय किंंजळे, सखाराम जाशी, पाणीपुरवठा विभागाचे शाखा अभियंता पोटुडे, बांधकाम विभागाचे शाखा अभियंता ढगे उपस्थित होते.
शिवसेना-भाजपचं विकासाशी काही देणंघेणं नाही. भाजपने राममंदिर आणि एन्रॉनच्या नावावर आजपर्यंत निवडणुका लढवल्या. पण, त्यांनी राममंदिरही बांधलं नाही आणि एन्रॉनमध्ये सर्वाधिक एजंट हे भाजपचे आहेत, असा आरोप जाधव यांनी यावेळी केला. ज्या पाणी योजनेचे उद्घाटन झाले, त्याचे पाणी सोडू नये म्हणून प्रयत्न आणि दमदाटी करणाऱ्या गावातील भाजपच्या कार्यकर्त्यांचा त्यांनी चांगलाच समाचार घेतला. हा तालुका शांत आहे. तो शांतच राहिला पाहिजे. पण, अशा पध्दतीचं घाणेरडं राजकारण सहन करणार नाही तसेच या मतदारसंघात शिवसेना-भाजपने माझ्या नादाला लागू नये, असा ईशाराही त्यांनी दिला.
यावेळी ग्रामस्थांनी फटाक्यांच्या आतशबाजीत आमदार जाधव यांचे स्वागत करत मिरवणुकीने त्यांना ग्रामपंचायत कार्यालयात आणले. यावेळी जाधव यांनी गावातील बौध्दवाडी येथील विहिरीची पाहणी केली. बौध्दविहार तसेच या परिसरात असलेल्या गौतम बुध्दांच्या महानिर्वाण स्थितीतील मूर्तीचे दर्शनही जाधव यांनी घेतले. कार्यक्रमात तालुकाध्यक्ष मुळ्ये, सभापती वाघे, सुनील जाधव, सुरेश सावंत, दत्तात्रय किंंजळे, दत्तकुमार शिगवण, आनंदा पवार यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक सरपंच सांगळे यांनी केले तर उपसरपंच राकेश पवार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)

गुहागर तालुक्यातील भेळवाडी येथे पाणी योजनेचे उद्घाटन आमदार भास्कर जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष विनायक मुळ्ये, पद्माकर आरेकर, पंचायत समिती सभापती विलास वाघे उपस्थित होते.

Web Title: BJP leadership can not fight with NCP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.