देवेंद्र फडणवीस यांच्या रत्नागिरीतील दौऱ्यावर भाजप पदाधिकाऱ्यांचा बहिष्कार, वरिष्ठांना फोन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2023 04:08 PM2023-10-23T16:08:23+5:302023-10-23T16:08:40+5:30
रत्नागिरी : तालुक्यातील नाणीज येथे शनिवारी कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दाैऱ्याकडे खुद्द भाजपच्या पदाधिकाऱ्यांनीच पाठ फिरवल्याने ...
रत्नागिरी : तालुक्यातील नाणीज येथे शनिवारी कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दाैऱ्याकडे खुद्द भाजपच्या पदाधिकाऱ्यांनीच पाठ फिरवल्याने साऱ्यांच्या भुवया उंचवल्या आहेत. पाली येथील हेलिपॅड आणि नाणीज येथील कार्यक्रमाच्या ठिकाणी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी हजेरी न लावल्याने त्यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या दाैऱ्यावरच बहिष्कार टाकल्याची चर्चा रंगू लागली आहे.
जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज यांच्या जन्मदिवसानिमित्त २१ ऑक्टाेबर राेजी नाणीज येथे कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते. या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहणार असल्याचे २० ऑक्टाेबर राेजी रात्री उशिराने सांगण्यात आले. शनिवारी सकाळी त्यांचे पाली (ता. रत्नागिरी) येथील हेलिपॅडवर आगमन झाले. याठिकाणी पालकमंत्री उदय सामंत, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, पाेलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे स्वागत केले. मात्र, याठिकाणी भाजपचा एकही पदाधिकारी उपस्थित नव्हता.
त्यानंतर उपमुख्यमंत्री मंत्री सामंत यांच्या पाली येथील निवासस्थानी गेले. तिथेही काेणीही पदाधिकारी न आल्याने ही बाब उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या लक्षात येताच त्यांनी याबाबत चाैकशीही केली. त्यावेळी ‘माझ्या घरी आले म्हणून आले नसतील; पण नाणीज येथे येतील,’ असे मंत्री सामंत यांनी सांगितले.
त्यानंतर नाणीज येथील मुख्य कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री फडणवीस गेले असता तिथेही भाजपचा एकही पदाधिकारी त्यांच्या स्वागताला अथवा भेटीला आलेला नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. याबाबत त्यांनी नाराजीही व्यक्त केली. भाजप जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष यांच्यासह पक्षातील नेतेमंडळींनी अनुपस्थिती दर्शवीत उपमुख्यमंत्र्यांच्या दाैऱ्यावरच बहिष्कार टाकल्याची चर्चा आता रंगू लागली आहे. याबाबत उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी पक्षातील वरिष्ठांनाही कल्पना दिल्याची चर्चा आहे.
वरिष्ठांना फाेन
दाैऱ्यात काेठेही भाजपचा एकही पदाधिकारी न फिरकल्याने उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व मंत्री रवींद्र चव्हाण यांना फाेन केला. त्यांनी हा सर्व प्रकार त्यांच्या कानावर घातल्याची चर्चा आहे.
खासगी दौरा
हा त्यांचा खासगी दौरा हाेता. त्यामुळे पदाधिकाऱ्यांनी या दौऱ्याकडे पाठ फिरवल्याची चर्चा सुरू आहे. जिल्ह्यातील नव्या पदाधिकाऱ्यांच्या वागणुकीमुळे अनेक कार्यकर्ते दुरावल्याची चर्चा आहे. मात्र, पक्षातील वरिष्ठ नेते येऊनही पदाधिकारी न आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.