नेत्यांकडे विकासाची दृष्टी आणि निधीसाठी हट्ट हवा : प्रमोद जठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2021 05:26 PM2021-12-11T17:26:24+5:302021-12-11T17:27:54+5:30
कोकणातील नद्यांचा गाळ उपसाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मोठ्या निधीची गरज आहे. केवळ ९ ते १० कोटी रूपयाने भागणार नाही. ते कोणाच्या खिशात जातील तेही समजणार नाही.
चिपळूण : कोकणातील नद्यांचा गाळ उपसा केला तर पूर्वीचे वैभव पुन्हा उभे राहील आणि विकालाही गती मिळेल. मात्र, त्यासाठी कोकणच्या नेत्यांकडे विकासाची दृष्टी हवी. निधी मागण्यासाठी हट्टही करायला हवा. तरच हा प्रश्न सुटू शकतो असे प्रतिपादन भाजपचे प्रदेश सरचिटणीस व माजी आमदार प्रमोद जठार यांनी केले.
वाशिष्ठी नदीतील गाळ उपसा करण्यासाठी व लाल, निळी पूररेषा रद्द करण्यासाठी चिपळूण बचाव समितीच्या माध्यमातून साखळी उपोषण सुरू आहे. गेल्या सहा दिवसापासून सुरू असलेल्या या उपोषणाला आज, शनिवारी प्रमोद जठार यांनी भेट देत येथील नागरिकांच्या भावना जाणून घेतल्या.
प्रमोद जठार म्हणाले की, चिपळूण बचाव समितीने लोकहिताचे काम हाती घेतले आहे. हा प्रश्न तडीस गेल्यास आपोआपच अन्य प्रश्नही सुटणार आहेत. त्यामुळे हा मुद्दा शेवटपर्यंत धरून ठेवणे आवश्यक आहे. कोकणातील विकासाची उंची समुद्राच्या खोलीत लपली आहे. ती खोली गाठल्याशिवाय यश नाही. त्यासाठी कोकणच्या नेत्यांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. निधी मिळवण्यासाठी हट्ट करायला हवा, तरच मिळणार आहे. अन्यथा सहजासहजी निधी मिळत नाही, हा आपला अनुभव आहे, असे ते म्हणाले.
मोठ्या निधीची गरज
सर्रासपणे कोकणचा माणूस कोणाकडे मदत मागत नाही किंवा मदतीची प्रतीक्षा करत बसत नाही. आलेल्या परिस्थितीला तोंड देणे हेच कोकणी माणसाला माहिती आहे. परंतु, हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मोठ्या निधीची गरज आहे. केवळ ९ ते १० कोटी रूपयाने भागणार नाही. ते कोणाच्या खिशात जातील तेही समजणार नाही. आपल्याला या प्रश्नी कोणतेही राजकारण करायचे नाही किंवा त्यासाठी आलेलो नाही, असे जठार यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांच्या सोबत नगरसेवक विजय चितळे, निशिकांत भोजने, शहराध्यक्ष आशिष खातू उपस्थित होते.