भाजपला अपेक्षेप्रमाणे जागा मिळतील, रामदेवबाबांनी केलं भाकित
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2022 01:38 PM2022-03-09T13:38:54+5:302022-03-09T14:04:42+5:30
निवडणुकीत भारतीय जनता पक्ष रसातळाला जाईल, असे वक्तव्य काहींनी केले होते. मात्र असे काही होणार नाही
रत्नागिरी : पाच राज्यांतील निवडणुकांचे निकाल लवकरच समोर येणार आहेत. निवडणुकीत भारतीय जनता पक्ष रसातळाला जाईल, असे वक्तव्य काहींनी केले होते. मात्र असे काही होणार नाही तर भाजपला अपेक्षेप्रमाणे जागा मिळतील. केजरीवाल यांनाही चांगल्या कामाची पावती मिळेल. वास्तविक निवडणुका ही एक परीक्षा आहे. सर्व पक्षांना निवडणुकांच्या माध्यमातून आत्ममूल्यांकन करण्याची संधी असल्याचे प्रतिपादन रामदेवबाबा यांनी केले.
महिला पतंजली योग समिती महाराष्ट्र (पश्चिम) तर्फे रत्नागिरीत प्रात:कालीन योग शिबिर व प्रांतिक महिला संमेलन आयोजित करण्यात आले असून, त्यासाठी रामदेव बाबा रत्नागिरीत आले असता त्यांनी पत्रकार परिषदेत मार्गदर्शन केले.
गेली नऊ वर्ष मी ‘नि:पक्ष’ राहून कार्यरत असून, सर्वांचा आदर, सन्मान करीत असल्याचे सांगितले. अकरा वर्षांनंतर रत्नागिरी आलो असून, लोकमान्य टिळक व स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना प्रथम अभिवादन केल्याचे त्यांनी सांगितले. कोरोनानंतर दोन वर्षांनंतर रत्नागिरीत प्रथम कार्यक्रम होत आहे.
गेली ४५ वर्षे मी योग करीत असून, ३० वर्षे लोकांकडून करवून घेत आहे. २०० कोटी लोक योग करीत आहेत. देश आरोग्यदृष्ट्या शक्तिशाली व विश्वाचे अग्रगण्य राष्ट्र बनावे हा उद्देश आहे. शिक्षण, आरोग्य, आर्थिकदृष्ट्या भारत २०३५ पर्यंत संपन्न व्हावा, यासाठी योगाच्या माध्यामातून आपले प्रयत्न आहेत, असे त्यांनी सांगितले.
महिला दिनाचे औचित्य साधून रत्नागिरीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येक कुटुंबात असाध्य व्याधींनी ग्रस्त रुग्ण आहेत. नागरिकांना रोगमुक्त, नाशमुक्त, तंटामुक्त पाहण्याची इच्छा असून, योगाच्या माध्यमातून शक्य असल्याचे रामदेव बाबा यांनी यावेळी सांगितले.
उदय सामंत यांच्यामुळे जिल्ह्याचा भाग्योदय
महाराष्ट्रात उद्धव ठाकरे चांगले काम करीत असून, रत्नागिरी जिल्ह्यात उदय सामंत यांच्यामुळे भाग्योदय होत आहे. केंद्रात चांगले काम सुरु असल्याने देशाच्या विकासासाठी सर्वांचे नक्कीच चांगले प्रयत्न आहेत. उदय सामंत राष्ट्र निष्ठा व योग निष्ठा प्रेमी असल्याचे सांगून त्यांचे वडील उद्योजक अण्णा सामंत यांनाही आपणासंबंधी आनंद, प्रेम असल्याचे रामदेवबाबा यांनी स्पष्ट केले.