भाजप युवा माेर्चाच्या कार्यकर्त्यांनी बुजविले खड्डे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:22 AM2021-07-15T04:22:27+5:302021-07-15T04:22:27+5:30
रत्नागिरी : गेले अनेक दिवस शिवाजीनगर परिसरात फूटभर खोल पडलेल्या चराचा वाहनचालकांना भयंकर त्रास होत आहे. मात्र, याकडे नगर ...
रत्नागिरी : गेले अनेक दिवस शिवाजीनगर परिसरात फूटभर खोल पडलेल्या चराचा वाहनचालकांना भयंकर त्रास होत आहे. मात्र, याकडे नगर परिषदेचे दुर्लक्ष हाेत असल्याने अखेर बुधवारी भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनीच हे खड्डे भरले. या प्रकाराची कुणकुण नगर परिषद प्रशासनाला कळताच त्यांनी तातडीने कर्मचारी पाठवून पुन्हा हे खड्डे भरून काढले.
भारतीय जनता युवा मोर्चाच्या शहर कार्यकर्त्यांनी बुधवारी सकाळी शिवाजीनगर येथे श्रमदान करून खड्डे भरले. या मुख्य मार्गावर भरपूर वर्दळ पाहायला मिळते. रस्त्यात पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत हाेता. गेल्या चार दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे या खड्ड्यांत पाणी साचल्याने नेमका खड्डा किती खोल आहे हे वाहनचालकांना कळत नव्हते.
याबाबत जनतेतून नाराजीचा सूर उमटत असताना नगरपरिषदेकडून काेणतीच पावले उचलली जात नव्हती. अखेर भाजयुमोने बॅरिकेटस लावून, वाहतुकीचे नियोजन करून तासाभरात दोन ठिकाणचे चर भरले. हा चर सुमारे फूटभर खोल होता. त्यामुळे भाजयुमोचे शहराध्यक्ष विक्रम जैन शहर सरचिटणीस प्रवीण देसाई, चिटणीस मंदार लेले व हर्षद घोसाळकर, प्रसाद बाष्टे, तन्मय दात्ये, भाजप शहर सरचिटणीस संदीप सुर्वे व अन्य कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन शिवाजीनगर येथे दोन चरांमध्ये डबर आणून भरून टाकले.
-----------------------
रत्नागिरी शहरातील शिवाजीनगर येथील रस्त्यावर पडलेले चर भाजयुमाेच्या कार्यकर्त्यांनी भर पावसात बुजविले.