रत्नागिरीत सेनेचा भाजपला दणका

By admin | Published: December 26, 2014 11:30 PM2014-12-26T23:30:34+5:302014-12-26T23:48:58+5:30

स्थायी समितीवरही बाजी : सर्व समित्यांवर शिवसेना-शहर विकास आघाडीचे वर्चस्व

BJP's Ratna Giri army raid | रत्नागिरीत सेनेचा भाजपला दणका

रत्नागिरीत सेनेचा भाजपला दणका

Next

रत्नागिरी : रत्नागिरी पालिकेच्या विषय समिती सभापती निवडणुकीत अखेर शिवसेना-शहरविकास आघाडीने भाजपला जोरदार दणका दिला. शिवसेना व शहर विकास आघाडीकडे १७ सदस्यसंख्या असल्याने सर्व सहाही समित्यांची सभापतिपदे आपल्याकडे राखण्यात त्यांना यश आले. कमी सदस्यसंख्येमुळे भाजप व मित्रपक्ष आघाडीच्या नगरसेवकांनी
अर्जही दाखल केले नाहीत. भाजपचे नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांची पुरती कोंडी करण्याच्या डावपेचात आज तरी शिवसेना यशस्वी ठरली आहे.
आज, शुक्रवारी झालेल्या या विषय समिती सभापती निवडणुकीत सेना-शहर विकास आघाडीच्या सदस्यांनीच दुपारी
२ वाजेपर्यंत आपले अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल केले. मात्र, भाजप मित्रपक्षांकडून एकही अर्ज दाखल करण्यात आला नाही. संख्याबळच ११ इतके कमी असल्याने सभापतिपद मिळविता येणार नाही हे स्पष्ट झाल्यानेच भाजपतर्फे अर्ज भरण्यात आले नाहीत. अर्ज भरण्याच्या २ वाजता या मुदतीपर्यंत केवळ सेना-आघाडीचेच अर्ज दाखल झाल्याने सार्वजनिक बांधकाम, शिक्षण, स्वच्छता व आरोग्य, पाणीपुरवठा व जलनिस्सारण, नियोजन व विकास, महिला व बाल कल्याण या समितींच्या सभापतिपदांची निवडणूक बिनविरोध झाली. (प्रतिनिधी)
(विषय समिती निवडणूक वृत्त हॅलो पान ४ वर)

कशी केली कोंडी.. जल्लोष
राष्ट्रवादीचे चार नगरसेवक आपल्या बाजूला वळवून शिवसेनेने याआधीच्या उपनगराध्यक्ष निवडणुकीवेळी भाजपवर कुरघोडी केली होती. त्याचवेळी विषय समित्यांवरही सेना-आघाडीच वर्चस्व राखणार असे चित्र होते. हे चित्र आज वास्तवात उतरले आहे. सर्व सभापती विजयी झाल्यानंतर सभागृहात सेना-आघाडीच्या कार्यकर्त्यांनी ‘कशी केली कोंडी...’ असेच मनोमन म्हणत विजयाचा जल्लोष केला.


थांबा अन् वाट पाहा : मयेकर
सभागृहात भाजप व मित्रपक्षांच्या सदस्यांची संख्या ही ११ असल्यानेच आम्ही सभापतिपदासाठी उमेदवारी अर्ज भरले नाहीत, असे सांगताना सेनेकडून शहर विकासासाठी सकारात्मक प्रतिसादाची अपेक्षा आहे. मात्र, सभापतिपदांची निवडणूक ही काही अखेरची नाही. अजून बरेच काही बाकी आहे. थांबा अन् वाट पाहा, असे सांगत नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांनी आपल्याकडे अजूनही काही हुकुमाची पाने शिल्लक असल्याचे संकेतच दिले आहेत.



अपात्रता सुनावणी महत्त्वाची ठरणार
राष्ट्रवादीतील ४ नगरसेवकांनी फुटून निघत शहरविकास आघाडी तयार केली. त्यांच्याविरोधातील अपात्रतेच्या प्रकरणाची सुनावणी येत्या ३१ डिसेंबरला होणार आहे. त्यामुळे या सुनावणीत या स्वतंत्र गटाची मान्यता सिध्द होणार असे सेना-आघाडीवाले ठामपणे सांगत आहेत, तर हा गट बेकायदा ठरेल, असे भाजपला वाटते आहे. त्यामुळे या सुनावणीनंतर काय निकाल लागतो यावरच पालिकेवर सेना-आघाडीचे वर्चस्व राहणार की भाजपचे, हे ठरणार आहे.

Web Title: BJP's Ratna Giri army raid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.