रत्नागिरी शहरावर जलसंकटाचे काळे ढग!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 10:38 PM2019-04-29T22:38:06+5:302019-04-29T22:38:11+5:30
प्रकाश वराडकर । लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : रत्नागिरी शहराला दररोज १५ ते १६ दशलक्ष लीटर (एमएलडी) पाणीपुरवठा करणाऱ्या ...
प्रकाश वराडकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : रत्नागिरी शहराला दररोज १५ ते १६ दशलक्ष लीटर (एमएलडी) पाणीपुरवठा करणाऱ्या शीळ धरणातील साठ्यात मोठी घसरण झाली आहे. हा पुरवठा १२ एमएलडीवर आला आहे. शीळ धरणातील साठा बाष्पीभवनामुळे आणखी घसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरावर जलसंकटाचे ढग जमू लागले आहे.
शहराला शीळ धरणातून दररोज सुमारे १५ ते १६ दशलक्ष लीटर पाणी पुरवठा केला जातो. पानवल धरणातून १ ते २ दशलक्ष लीटर पाणी पुरविले जाते. मात्र, पानवल धरण हे दरवर्षी फेब्रुवारी किवा मार्च महिन्यात कोरडे होते. त्यामुळे पानवलचा पुरवठा आधी बंद होतो. नाचणे तलावातूनही अर्धा ते एक एमएलडी पाणीपुरवठा होतो. सध्या पानवल व नाचणेचा पाणीपुरवठा बंद आहे.
बाष्पीभवनाचे प्रमाण वाढणार
सध्या शीळ धरणातून शहराला १२ एमएलडी पाण्याचा पुरवठा केला जात आहे. शीळ धरणामध्ये कमी साठा असल्याने पाणी उपसा कमी करण्यात आला आहे. बाष्पीभवनामुळे शीळ धरणातील साठा येत्या काही दिवसात आणखी घसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे रत्नागिरीकरांना येत्या मे महिन्यात पाणी टंचाईशी सामना करावा लागणार अशी चिन्ह दिसू लागली आहेत.
१५ जूनपर्यंतचा साठा?
गेल्या काही वर्षांमध्ये जुलै ते आॅगस्ट महिन्यापर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा शीळ धरणात असायचा. गेल्या पावसाळ्यात सुरूवातीला दोन महिने जोरदार पाऊस झाला. त्यावेळी धरण पूर्ण भरले. मात्र नंतरच्या काळात पाऊस कमी झाला. त्यामुळे घसरलेली पाणी पातळी भरून आली नाही. परिणामी यंदा पाणी संकट निर्माण झाले आहे. चिपळूण पाटबंधारे विभागाकडे असलेल्या या शीळ धरणामध्ये सध्या १.३१४ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे. हे पाणी येत्या १५ जूनपर्यंत पुरेल, असा अंदाज आहे. पाऊस उशिरा सुरू झाला तर आधीच टंचाई, कमी दाबाने पाणी व जलवाहिन्यांची गळती यामुळे पाणी टंचाईचे संकट अधिक गडद होण्याची भीती आहे.
जलवाहिनी फुटण्याचे प्रकार
सध्या वापरात असलेली मुख्य जलवाहिनी जागोजागी फुटत असल्याने दुरुस्ती करण्यातच वेळ वाया जात असल्याने पंपाद्वारे पाणी उपसा करण्यासाठी कमी वेळ उपलब्ध होत आहे. शहराअंतर्गत वितरण वाहिन्याही जुनाट झाल्याने सातत्याने नादुरुस्त होत आहेत. त्यामुळे पाणी गळतीचे प्रमाण मोठे असून, गेल्या पाच वर्षांपासून कमी दाबाने पाणी पुरवठ्याची समस्या कायम आहे.
दररोज टॅँकरच्या ५०-५५ फेºया
अपुºया पाणी पुरवठ्याची गंभीर स्थिती पाहता गेल्या तीन महिन्यांपासूनच १५ प्रभागांमध्ये टॅँकरने पाणी पुरवठा केला जातो. सध्या दररोज ५ टॅँकरद्वारे ५० ते ५५ फेºया करून शहरवासियांना पुरवठा केला जात आहे. तरीही टॅँकरद्वारे पाण्याची मागणी पूर्ण होत नसल्याचे दिसून येत आहे.