नाराज शेतकऱ्यांनी आमदारांना दाखवले काळे झेंडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 04:20 PM2019-02-25T16:20:06+5:302019-02-25T16:21:32+5:30
विकासकामांची कोणतीही वर्कआॅर्डर नसताना सेनेचे आमदार सदानंद चव्हाण हे संगमेश्वर तालुक्यातील हातीव येथे कामाच्या भूमिपूजन समारंभासाठी आले होते. मात्र, भूमिपूजन होणाऱ्या रस्त्याला जागा देण्यासाठी काही शेतकरी नाखुष असल्याने या नाराज शेतकऱ्यांनी काळे झेंडे व निषेधाचे फलक आमदारांना दाखवल्याची महिती भाजपचे युवक तालुकाध्यक्ष व हातीवचे ग्रामस्थ रूपेश कदम यांनी दिली.
देवरूख : विकासकामांची कोणतीही वर्कआॅर्डर नसताना सेनेचे आमदार सदानंद चव्हाण हे संगमेश्वर तालुक्यातील हातीव येथे कामाच्या भूमिपूजन समारंभासाठी आले होते. मात्र, भूमिपूजन होणाऱ्या रस्त्याला जागा देण्यासाठी काही शेतकरी नाखुष असल्याने या नाराज शेतकऱ्यांनी काळे झेंडे व निषेधाचे फलक आमदारांना दाखवल्याची महिती भाजपचे युवक तालुकाध्यक्ष व हातीवचे ग्रामस्थ रूपेश कदम यांनी दिली.
हातीव शाळा क्रमांक १ ते बौध्दवाडी व माडबने स्मशानभूमी रस्त्याच्या भूमिपूजनासाठी आमदार सदानंद चव्हाण येणार होते. मात्र, या दोन्ही कामांची वर्कआॅर्डर काढण्यात आलेली नाही. या रस्त्याला जागा देण्यासाठी काही शेतकऱ्यांचा विरोध आहे. त्यामुळे आमदार चव्हाण यांना विकासकामांच्या भूमिपूजनासाठी हातीव गावात बोलावू नये, असे सेनेच्या येथील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना सांगण्यात आले होते. अन्यथा काळे झेंडे, फलकासह आमदारांचा जाहीर निषेध करण्यात येईल, असेही सांगण्यात आले होते, असे कदम यांनी सांगितले.
मात्र, त्यानंतरही आमदार चव्हाण हे शनिवारी विकासकामांच्या भूमिपूजनासाठी सायंकाळी हातीव गावात दाखल झाले. यामुळे संतप्त झालेल्या काही शेतकऱ्यांनी आमदारांना काळे झेंडे, निषेधाचे फलक दाखवून त्यांचा निषेध केला. यावेळी शेतकऱ्यांमध्ये नाराजी असतानादेखील आमदारांचा मान राखून त्यांना भूमिपूजन करण्यासाठी देण्यात आले.
भूमिपूजन झाल्यानंतर आमदार चव्हाण हे यांनी या शेतकऱ्यांशी चर्चा केली. ज्या रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले त्या कामाची वर्कआॅर्डर आहे किंवा नाही, याची कल्पना आपल्याला कार्यकर्त्यांनी दिली नसल्याचा निर्वाळा आमदारांनी यावेळी दूरध्वनीवरून दिल्याची महिती कदम यांनी दिली. ज्यांची जमीन या रस्त्यासाठी जात आहे, त्यांना न्याय न मिळाल्यास आंदोलन छेडण्यात येईल, असेही रूपेश कदम यांनी स्पष्ट केले आहे.