पावस बसस्थानकात काळोखाचे साम्राज्य
By admin | Published: July 22, 2014 09:48 PM2014-07-22T21:48:10+5:302014-07-22T22:15:11+5:30
प्रवाशांना आरक्षण करणे अशक्य
पावस : पंचक्रोशीचा महत्त्वाचा दुवा अशी ओळख असणाऱ्या पावस येथील बसस्थानकातील विद्युत प्रवाह वारंवार खंडित होत असल्याने येथे गेल्या चार दिवसांपासून काळोखाचे साम्राज्य पसरले आहे. येथील संगणकीय आरक्षण केंद्रही बंद असल्याने मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांना आरक्षण करणे अशक्य होत आहे.
रत्नागिरीकडे येणाऱ्या सर्व बसेस पावसला थांबतात. राज्यातील विविध क्षेत्रातून येणाऱ्या पर्यटकांसाठी पावस हे पर्यटनस्थळ व तिर्थक्षेत्र म्हणऊन पसंतीस उतरलेले आहे. मात्र या ठिकाणी असणाऱ्या एसटीस्थानकात वीज गेल्याने हे स्थानक अंधारात राहिल्याने प्रवासी, पर्यटक यांच्यात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. पर्यटन केंद्र म्हणून नावारुपास येत असलेलं पावस गाव पंचक्रोशीचे मुख्य केंद्र म्हणून ओळखले जाते. एस. टी.च्या या परिसरातील वाहतुकीचे नियंत्रण याच ठिकाणाहून होत असते. पावस बसस्थानकामध्ये असलेल्या नियंत्रण कक्षातून आंबोळगड, देवाचेगोठणे, आडिवरे, वेल्ये, हर्चे आदी गावातून मुंबई - परळ - बोरिवलीकडे जाणाऱ्या गाड्यांचे संगणकीय आरक्षण दिले जाते. मात्र, गेले चार दिवस स्थानकातील वीजपुरवठा खंडित असल्यामुळे ही सेवा ठप्प झाली आहे. पावसमधील महाविद्यालय दोन सत्रात चालविले जात असल्याने ग्रामीण भागातून येणारे विद्यार्थी विशेषत: युवती संध्याकाळी या स्थानकामध्ये येतात. चांदोर, नाखरे, डोर्ले - हर्चे, गणेशगुळे आदी गावात जाणाऱ्या संध्याकाळच्या फेऱ्या ७ नंतर या स्थानकात येत असतात. गेले चार दिवस वीज नसल्याने संध्याकाळी ६.३० नंतर स्थानकात काळोखाचे साम्राज्य पसरते. याचा फायदा रोडरोमिओ घेत असतात.
नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला असता वाहतूक नियंत्रक गोगटे यांनी महावितरणकडे तक्रार करुन चार दिवस झाले तरी त्यांनी दखल घेतली नसल्याचे सांगितले. रात्रीच्या वेळी स्थानकात काळोखाचे साम्राज्य असल्याने अशा रोमिओपासून सुटका करुन घेण्यासाठी महाविद्यालयीन युवती आणि महिलांना शेजारच्या दुकानांचा आसरा घ्यावा लागत आहे. (वार्ताहर)