अणसुरे येथील रेशन दुकानावर धान्याचा काळाबाजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:31 AM2021-04-27T04:31:45+5:302021-04-27T04:31:45+5:30
राजापूर : तालुक्यातील अणसुरे येथील रेशन दुकानावरून कोरोनाच्या काळातही धान्याचा काळाबाजार होत असल्याची शंका ग्रामस्थांनी उपस्थित केली आहे. या ...
राजापूर : तालुक्यातील अणसुरे येथील रेशन दुकानावरून कोरोनाच्या काळातही धान्याचा काळाबाजार होत असल्याची शंका ग्रामस्थांनी उपस्थित केली आहे. या संदर्भात अणसुरे ग्रामपंचायतीच्या माजी सदस्य श्रुती नंदकुमार गोलतकर यांनी ग्रामपंचायतीकडे तक्रार दाखल केली असून, लाभार्थ्यांना धान्य वाटप न करता, परस्पर त्याचा काळाबाजार होत असल्याचा संशय व्यक्त केला आहे.
अणसुरे रेशन दुकान विविध कार्यकारी सोसायटी, अणसुरे यांच्या माध्यमातून चालविले जात आहे. दोनच दिवसांपूर्वी आपण आपले धान्य घेण्यासाठी या दुकानावर गेलो असता, आपल्यासह सुमारे ४४ कार्डधारकांचे तांदूळ शिल्लक नव्हते. मात्र, जवळपास चौदा-पंधरा पोती गहू मात्र शिल्लक दिसत होता. याबाबत आपण विचारणा केली असता, सध्या तांदूळ संपला आहे. महिनाअखेरपर्यंत सर्वांना दिला जाईल, असे सांगण्यात आले.
त्यांनी सांगितले की, आपण स्वतः काही वर्षे एका रेशन दुकानावर काम केले असल्यामुळे शासनाकडून आलेले धान्य कशाप्रकारे वितरित होते, याचा आपल्याला थोडासा अनुभव आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना आलेले धान्य वितरित करताना गहू व तांदूळ दोन्ही संपणे आवश्यक होते. मात्र, केवळ तांदूळ संपल्याने आपण त्यांच्याकडे मागणी पत्राची मागणी केली. मात्र, त्यांनी ती द्यायला नकार दिला. मागील महिन्यातही आपल्याला अशाचप्रकारे केवळ गहू मिळाले होते. सुमारे ४४ रेशन कार्डधारकांना तांदूळ मिळाला नाही, याचा अर्थ आलेल्या धान्य साठ्यामधून केवळ तांदूळ काळ्या बाजाराने विकला तर गेला नाही ना, याची शहानिशा करावी, अशी मागणी आपण ग्रामपंचायतीकडे केल्याचे गोलतकर यांनी सांगितले.